पती-पत्नीच्या भांडणावरून जावयाचा खून
दुचाकीच्या अपघातात मृत्यू झाल्याचा बनाव लोणीकंद पोलिसांनी आणला उघडकीस : सासरे आणि आजेसासऱ्यांना अटक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : भांडण झाल्याने घर सोडून गेलेल्या पत्नीचा शोध घेत सासरी गेलेल्या रिक्षाचालक जावयाचा आजेसासरे आणि सासरे यांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला. दुचाकीवरून जाताना पडल्याने मृत्यू झाल्याचा बनाव त्यांनी रचला होता. लोणीकंद पोलिसांनी हा बनाव उघडकीस आणून आजेसासरे आणि सासरे यांना अटक केली आहे.
आजेसासरे रहीम मोहम्मद शेख (वय ६५) आणि सासरे अमर रहीम शेख (वय ४५, दोघे रा. चौफुला वस्ती, कोलवडी, ता. हवेली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सुलतान सादीक शेख (वय २४, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) असे खून झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. याबाबत त्याचा भाऊ साबीर सादीक शेख (वय २६) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना ९ नोव्हेंबर रोजी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास कोलवडी येथील चौफुला वस्ती येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुलतान शेख हा रिक्षाचालक होता. त्याचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्याचे पत्नीबरोबर भांडण झाले होते. त्यावरून सासू-सासरे ९ नोव्हेंबर रोजी त्याच्या पत्नीला घेऊन गेले होते. त्यानंतर सुलतान शेख हा पत्नीचा शोध घेत रात्री चौफुला वस्तीतील सासरी गेला होता. तेथे त्याचे आजेसासरे आणि सासरे यांनी पती-पत्नीच्या भांडणाचा राग मनात धरून सुलतान याला लाकडी दांडक्याने डोक्यात, हातावर आणि पाठीवर बेदम मारहाण केली. या मारहाणीत सुलतान शेख याचा मृत्यू झाला.
त्यानंतर त्यांनी सुलतान याला रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांनी दुचाकीवरून पडल्याने तो जखमी झाल्याचे सांगितले.
लोणीकंद पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे यांनी सांगितले की, सुलतान याचा अपघातात मृत्यू झाल्याचे आरोपींनी सांगितले होते. मात्र, अपघातात टाळूला दुखापत होत नाही. त्याला मारहाण केल्याचे दिसून येत होते. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. त्यांच्या घरासमोरील रस्त्यावर ही घटना घडल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, तेथे कोणतीही दुचाकी नव्हती. अपघाताच्या कोणत्याही खुणा दिसत नव्हत्या. त्यामुळे पोलिसांनी सखोल चौकशी केली असता, त्यांनी मारहाण केल्याची कबुली दिली. ज्या लाकडी दांडक्याने मारहाण केली होती, ते दांडके जप्त करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक पवार या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
