प्रीतम यावलकर आणि विजय कबाडे यांची अदलाबदल, ‘या’ महिला अधिकारी सोलापूरच्या नव्या DCP
प्रीतम यावलकर शहर उपायुक्त, तर विजय कबाडे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
सोलापूर (परशुराम कोकणे) : सोलापूर शहर आणि ग्रामीण पोलीस दलात मोठे प्रशासकीय फेरबदल करण्यात आले आहेत. गृह विभागाच्या ताज्या आदेशानुसार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर करण्यात आल्या असून, शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील अधिकाऱ्यांची अदलाबदल करण्यात आली आहे. तसेच नागपूर येथून एका महिला आयपीएस अधिकाऱ्याची सोलापुरात नियुक्ती करण्यात आली आहे.
सोलापूर ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांची सोलापूर शहर पोलीस दलात पोलीस उपायुक्त (DCP) पदावर बदली करण्यात आली आहे. तर सोलापूर शहराचे पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांच्याकडे आता सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
याशिवाय, सोलापूर शहर मुख्यालयाच्या पोलीस उपायुक्त गौहर हसन यांची पुणे शहर पोलीस दलात पोलीस उपायुक्त पदावर बदली करण्यात आली आहे. तसेच नागपूर येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक वृष्टी जैन यांची सोलापूर शहरात पोलीस उपायुक्त (DCP) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, सोलापूरच्या नव्या पोलीस उपायुक्त वृष्टी जैन या सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) कुशल जैन यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे आता सोलापूर जिल्हा परिषद आणि सोलापूर पोलीस दल अशा दोन्ही महत्त्वाच्या प्रशासकीय यंत्रणांमध्ये हे अधिकारी दांपत्य कार्यरत राहणार आहे.
