आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

बडतर्फ पीएसआय अजित बडे, कर्मचारी तायडेला अटक

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • May 16, 2026
Spread the love

पुणे : नामांकित महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडून तब्बल ७ लाख रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस अंमलदाराला तब्बल ३६ दिवसांनी गुन्हे शाखेने अटक केली आहे.

पोलीस उपनिरीक्षक अजित त्र्यंबक बडे आणि पोलीस अंमलदार सुदाम बाळकृष्ण तायडे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणातील बडतर्फ महिला पोलीस अंमलदार आणि रील स्टार म्हणून चर्चेत असलेली सोनाली हिंगे अद्याप फरार असून तिचा शोध सुरू आहे.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या तिघांना पोलीस सेवेतून बडतर्फ केले आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील दामिनी पथकात कार्यरत असताना सोनाली हिंगे हिची एका अल्पवयीन मुलीशी ओळख झाली होती.

आरोपींनी तिला नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवत जाळ्यात ओढल्याचा आरोप आहे. त्यानंतर संबंधित मुलीवर तक्रारदारांविरोधात खोटी तक्रार दाखल करण्यासाठी दबाव आणण्यात आला.

तसेच, लैंगिक अत्याचारांपासून बालकांचे संरक्षण कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्याची भीती दाखवण्यात आली.
वैयक्तिक आणि संस्थेची बदनामी करण्याचा कट रचून प्राचार्यांकडून ७ लाख रुपयांची खंडणी उकळण्यात आली. या तरुणीने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे ही माहिती दिल्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप यांना चौकशीचे आदेश देण्यात आले.

त्यांनी चौकशी करून ९ एप्रिल रोजी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तेव्हापासून हे तिघे फरार होते.