आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

सॉफ्टवेअर इंजिनियरला १० लाखांचा गंडा

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • May 16, 2026
Spread the love

पुणे : सॉफ्टवेअर इंजिनियरच्या कंपनीच्या आभासी चलन व्यवहारातील (क्रिप्टो करन्सी वॉलेट) खात्यावर सायबर हल्ला करून त्यातील ८ वॉलेटमधून ९ लाख ८४ हजार ४६९ रुपयांचे चलन लंपास करण्यात आले आहे.

याप्रकरणी बालेवाडी येथील एका ५० वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना २१ एप्रिल ते ७ मे २०२६ दरम्यान घडली आहे.

रुमानियामधून हा सायबर हल्ला झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची क्रिस्टल एम्पायर येथे स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी आहे. तसेच ते स्वतः क्रिप्टो करन्सीमध्ये ट्रेडिंग करतात. ते हम्ब या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ट्रेडिंग करतात.

त्यांचे क्रिप्टोचे मल्टिपल वॉलेट असून, वेगवेगळ्या कंपनींचे एकूण ८ वॉलेट आहेत. ७ मे २०२६ रोजी नेहमीप्रमाणे ते सर्व क्रिप्टो वॉलेट तपासत होते.

त्यावेळी त्यांच्या वॉलेटमध्ये शिल्लक कमी दिसत होती. त्यांच्या लक्षात आले की, सायबर चोरट्यांनी त्यांच्या परवानगीशिवाय सायबर हल्ला करून त्यांच्या वॉलेटचे ब्लॉकचेन अ‍ॅड्रेस आणि प्रायव्हेट कीचा वापर करून वॉलेटमधील एकूण १०,३६३ यूएसडीटी म्हणजेच ९ लाख ८४ हजार ४६९ रुपयांची क्रिप्टो करन्सी फसवणूक करून चोरून नेली आहे. पोलीस निरीक्षक अलका सरग तपास करत आहेत.

क्रिप्टो करन्सीतील चोरीचा प्रकार नवा
फिर्यादी यांनी त्यांच्या एका ओळखीच्या क्रिप्टो एक्सपर्टला यूएसडीटी कुठे ट्रान्सफर झाले याची माहिती काढण्यास सांगितले. त्यांनी तपास करून ही रक्कम Binance Hot Wallet6, KuCoin Hot Wallet2 आणि RedotPay Hot Wallet या वेगवेगळ्या वॉलेटमध्ये ट्रान्सफर झाल्याचे निष्पन्न केले. क्रिप्टो करन्सी चोरीचा हा प्रकार तुलनेने नवा आहे. याबाबत फिर्यादी यांनीच सायबर एक्सपर्टमार्फत मुख्य तपास केला आहे. ज्या कंपनीच्या वॉलेटमध्ये हे पैसे गेले आहेत, त्यांना हे चोरीचे पैसे असल्याचे पटवून दिल्यास ते परत मिळू शकतात.