शिक्षणसेवेचा विस्तार : पुण्यात अत्याधुनिक कन्या छात्रावासाचे भूमीपूजन
जैन समाजाच्या शैक्षणिक परिवर्तनाचा वारसा पुढे नेत ६० कोटींच्या नव्या वसतिगृह प्रकल्पाची सुरुवात
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : “प्रगल्भ समाज घडवण्यासाठी धर्माइतकेच लौकिक शिक्षणही महत्त्वाचे आहे. शिक्षणापासून वंचित राहिलेल्या जैन समाजात परिवर्तन घडवून आणण्यासाठी विसाव्या शतकाच्या प्रारंभी जैन आचार्य पंजाब केसरी विजय वल्लभ सूरी यांनी मोठे धाडस केले. त्या काळातील कर्मठ प्रस्थापित समाजाचा विरोध झुगारून त्यांनी १९१४ साली मुंबईतील गोवालिया टँक परिसरात पहिल्या महावीर जैन विद्यालयाची स्थापना केली आणि तीच जैन समाजासाठी क्रांतिकारक ठरली,” असे प्रतिपादन जैन आचार्य गच्छाधिपती पद्मश्री नित्यानंद सूरीश्वरजी यांनी केले.
पुण्यात नव्या कन्या छात्रावासाच्या भूमीपूजन सोहळ्यात ते बोलत होते. गुरुमहाराजांच्या उपस्थितीत सुमारे ३५० विद्यार्थिनींची क्षमता असलेल्या आणि तब्बल ६० कोटी रुपये खर्चाच्या अत्याधुनिक मुलींच्या वसतिगृहाचे भूमीपूजन उत्साहात पार पडले.
या प्रसंगी संस्थेचे विश्वस्त राजेशभाई चोखावाला, संस्थेचे सचिव युवराज शहा, अन्य साधुगण व साध्वीजी उपस्थित होते. तसेच स्थानिक समितीतील जयेश संघवी, सहसचिव कल्पेश शहा, विजेंद्र पटनी, विवेक शहा, शरद शहा, आर्किटेक्ट गौरव शहा, कमलेश मोतीवाले, निलेश मेहता, बिपीन शहा, कन्या छात्रालयाच्या अलका मोतीवाले, पूर्वा शहा, प्रज्ञा शहा, रवीना शहा, प्रितीबेन शहा आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर माजी विद्यार्थी पार्थ वखारिया आणि साकेत शहा यांनी ‘संक्रांत भक्तीसंगीत’चा बहारदार कार्यक्रम सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
आचार्य नित्यानंद सूरीश्वरजी पुढे म्हणाले की, आज देशभर हजारो जैन शैक्षणिक संस्थांचे जाळे उभे राहिले आहे. पुण्यातदेखील लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी शिक्षणसंस्था सुरू करून समाजात शिक्षणाची चळवळ निर्माण केली.
त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत तत्कालीन जैन समाजातील धुरीण गगलभाई हाथीभाई आणि पोपटलाल शहा यांच्या पुढाकारातून १९२० साली डेक्कन जिमखान्यावर भारत जैन विद्यालयाची स्थापना करण्यात आली.
ग्रामीण भागातून शिक्षणासाठी पुण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निवास आणि भोजनाची सोयही करण्यात आली होती. मात्र, पुण्यात वारंवार होणाऱ्या प्लेगच्या साथींमुळे अनेक विद्यार्थ्यांनी पुण्याकडे पाठ फिरवली.
त्यामुळे भारत जैन विद्यालय चालविणे कठीण बनले आणि अखेरीस १९४६ साली ही संस्था मुंबईतील महावीर जैन विद्यालयात विलीन करण्यात आली.
यानंतर १९६५ मध्ये नवीन इमारत उभारण्यात आली. मात्र, पुढे कमकुवत व्यवस्थापनामुळे १९९३ च्या सुमारास विद्यार्थीगृह बंद करण्याचा निर्णय घेण्याची वेळ आली.
अखेरीस जुने व्यवस्थापन बदलून संस्थेची धुरा माजी विद्यार्थ्यांकडे सोपविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. गेल्या ३३ वर्षांपासून युवराज शहा हे संस्थेचे सलग सचिव म्हणून कार्यरत असून त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने मोठी झेप घेतली आहे.
अवघ्या ६० विद्यार्थ्यांवरून आज संस्था १२०० विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली आहे. मंदिर, ४०० क्षमतेचे नवे मुलांचे विद्यार्थीगृह उभारण्यात आले असून, विद्यमान २५० क्षमतेच्या मुलींच्या वसतिगृहासोबत आणखी ४०० विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृह तसेच पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी १४० क्षमतेचे वसतिगृह प्रस्तावित आहे.
याशिवाय स्पोर्ट्स क्लब, मैदाने, ग्रंथालये आणि विविध शैक्षणिक सुविधा विकसित करण्याच्या अनेक योजना राबविण्यात येत आहेत. त्यामुळे महावीर जैन विद्यालयाच्या इतर संस्थांच्या तुलनेत पुण्यातील ही संस्था सर्वाधिक प्रगतीशील आणि व्यापक स्वरूपाची संस्था म्हणून पुढे येत असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
