आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

मारहाण करून टोळक्याने केला तरुणाचा खून

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • August 3, 2026
Spread the love

पुणे : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या मिरवणुकीत आंबेगाव पठारावरील मुलांबरोबर भांडणे झाली होती. त्यातून केवळ पठारावर राहणारा असल्याच्या कारणावरून टोळक्याने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याची घटना समोर आली आहे. पर्वती पोलिसांनी या प्रकरणी ५ जणांना अटक केली आहे.

शुभम राजू घोडके (वय २२, रा. चरवड वस्ती, वडगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. अंकुश सुभाष कांबळे (वय १९), मुकुंद हिरामण राजगुरू (वय ३०), गणेश कदम (वय २२), अर्जुन विठ्ठल कांबळे (वय २४), अनिकेत देवीदास कांबळे (वय २३, सर्व रा. वडगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याशिवाय ५ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत विष्णू शिवाजी शिरसाठ (वय २२, रा. चरवड वस्ती, वडगाव बुद्रुक) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ही घटना सिंहगड रोडवरील पानमळा वसाहत येथील वृंदावन नर्सरीजवळ शनिवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम घोडके हा वडगाव येथील एका वॉशिंग सेंटरमध्ये काम करत होता.

तो शनिवारी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त निघालेली मिरवणूक पाहण्यासाठी सारसबाग येथे आला होता. या मिरवणुकीत आंबेगाव पठार येथील मुलांमध्ये आणि वडगाव येथील मुलांमध्ये भांडणे झाली होती.

त्यावेळी पठारावरील मुलांनी वडगावमधील मुलांना मारहाण केली होती. मात्र, शुभम घोडके याचा त्या भांडणाशी कोणताही संबंध नव्हता.

मिरवणूक पाहून तो रात्री घरी परत जात होता. त्याच्यासोबत त्याचा मेव्हणाही होता. ते वृंदावन नर्सरीजवळ थांबले असताना वडगाव येथील टोळके तेथे आले.

त्यांनी शुभमला पाहताच, “हा पठारावरचा आहे, मारा याला,” असे म्हणत त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. शुभमच्या मेव्हण्याने त्याला वाचविले. त्यानंतर टोळके तेथून पळून गेले.

त्यानंतर शुभम आणि त्याचा मेव्हणा रिक्षाने घरी निघाले. वाटेत शुभमला प्रकृतीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याच्या घरच्यांना बोलावून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र, उपचार सुरू असताना रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास शुभम घोडके याचा मृत्यू झाला. पर्वती पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक केली असून, त्यांच्यासोबत असलेल्या पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुभाष महाले करीत आहेत.