अल्पवयीन मुलासह साथीदाराकडून केल्या १४ मोटारसायकली जप्त
विश्रामबाग पोलिसांची कामगिरी : पुण्यासह इतर जिल्ह्यांतील १२ गुन्हे उघडकीस
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : नवी पेठेतील मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना अल्पवयीन मुलाला विश्रामबाग पोलिसांनी पकडले. त्याचा साथीदार वैभव सांगुळे पळून गेला. अल्पवयीन मुलगा व त्याचा आणखी एक साथीदार अशा तिघांनी चोरलेल्या १४ मोटारसायकली विश्रामबाग पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
नवी पेठेतील चिमणबाग सोसायटी येथील फिर्यादीची मोटारसायकल २३ जून २०२६ रोजी चोरीला गेली होती. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, नारायण पेठेत दोघे संशयित थांबले आहेत.
पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यात वैभव सांगुळे (रा. सुतारदरा, कोथरूड) हा पळून गेला. त्याच्या साथीदार असलेल्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले.
त्याच्या आत्याच्या उपस्थितीत त्याची चौकशी करण्यात आली. त्यामध्ये त्यांच्यासोबत आणखी एक साथीदार असल्याचे समोर आले.
त्यानुसार पोलिसांनी कृष्णा चंद्रकांत शेळके (वय २६, रा. माळेगाव, ता. अहमदपूर, जि. लातूर) याला अटक केली. या आरोपींकडून विश्रामबाग पोलीस ठाण्यातील २ गुन्हे उघडकीस आले.
समर्थ, हडपसर, काळेवाडी, भारती विद्यापीठ आणि विमानतळ पोलीस ठाण्यांतील प्रत्येकी एक वाहनचोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. इतर जिल्ह्यांतील ५ गुन्हे, असे एकूण १२ गुन्हे उघडकीस आले आहेत.
चोरट्यांकडून एकूण १४ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून, आणखी २ मोटारसायकलींचा शोध सुरू आहे. वैभव सांगुळे याचा पोलीस शोध घेत आहेत.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप, पोलीस निरीक्षक विकास भिंगारदिवे, रमेश लाहिगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक उमेश कारके, पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड, मेहबुब मोकाशी, पोलीस अंमलदार अमोल भोसले, नितीन मुंढे, महेश कदम, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, शशीकांत दरेकर, कैलास डुकरे, जाकीर मणियार, अनिस शेख, शिवदत्त गायकवाड, सागर मोरे, अर्जुन थोरात, भास्कर गायकवाड आणि उमेश गव्हाणे यांनी केली आहे.
