गोळीबार करून पळून गेलेले रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद
आंबेगाव पोलिसांची कामगिरी : ५ जणांना अटक करून ३ गावठी पिस्तूल, ४ जिवंत काडतुसे जप्त
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पूर्ववैमनस्यातून घरी जात असलेल्या तरुणावर गोळीबार करून पळून गेलेल्या रेकॉर्डवरील ५ गुन्हेगारांना आंबेगाव पोलिसांनी पकडून त्यांच्याकडून ३ गावठी पिस्तूल व ४ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
शिवदत्त ऊर्फ सोन्या हरीकाका कोंढरे (वय २३, रा. आंबेगाव), श्रेयश रुपेश काटे (वय २३, रा. धायरी फाटा), सुरज सुभाष डिंबळे (वय २३, रा. कल्याण), अतिष उमेश मोरे (वय २८, रा. आंबेगाव), ऋत्विक ऊर्फ दगडू पांडुरंग बेलदरे (वय २४, रा. आंबेगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पौर्णिमा रामदास माने (वय ४३, रा. हरणाई कॉम्प्लेक्स, आंबेगाव) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चंद्रकांत रामदास माने (वय २१) याच्या दिशेने आरोपींनी गोळीबार केला होता.
ही घटना ५ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री दीड वाजता घडली होती. चंद्रकांत माने हे जिन्याने चालत घरी जात होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी त्यांच्या दिशेने २ गोळ्या झाडल्या होत्या.
आंबेगाव पोलीस या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत होते. यावेळी तांत्रिक विश्लेषणावरून ते जांभुळवाडी येथील दख्खन हॉटेलच्या रोडलगत थांबल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्यांना पिस्तूल व जिवंत काडतुसांसह पकडले. त्यांच्याकडून ३ गावठी पिस्तूल व ४ जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत.
ही कारवाई पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे, पोलीस अंमलदार चेतन गोरे, हणमंत मासाळ, हरीश गायकवाड, निलेश जमदाडे, अवधुत जमदाडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, ज्ञानेश्वर चित्ते, राकेश टेकावडे, प्रमोद भोसले, नितीन कातुर्डे, योगेश जगदाळे, अजय कामठे, सुभाष मोरे, शिवाजी पोटोळे व फिरोज शेख यांनी केली आहे.
