सायबर चोरट्यांकडून डॉक्टर महिलेची फसवणूक
ब्लिंकईट कस्टमर केअरमधून बोलत असल्याचा बनाव : एपीके फाईल डाउनलोड करायला लावली
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : सायबर चोरट्यांनी बिबवेवाडी भागातील एका डॉक्टर महिलेची ७४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत एका डॉक्टर महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ६२ वर्षीय डॉक्टर महिला बिबवेवाडी भागातील श्री संत एकनाथनगर परिसरात राहतात.
६ ऑक्टोबर रोजी सायबर चोरट्याने त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. ऑनलाइन वस्तू घरपोच देणाऱ्या ब्लिंकईटच्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याची बतावणी केली.
त्यानंतर सायबर चोरट्याने डॉक्टर महिला आणि त्यांच्या पतीच्या मोबाइल क्रमांकावर एपीके फाईल पाठवली. चोरट्याने ती फाईल डाउनलोड करण्यास सांगितले.
डॉक्टर महिलेने हे अॅप मोबाइलमध्ये डाउनलोड केले. त्यांनी त्यात बँक खात्याची माहिती दिली होती. या माहितीचा गैरवापर करून चोरट्याने बिबवेवाडी भागातील एका बँक खात्यातून ७४ हजार रुपये लांबवले.
खात्यातून पैसे काढण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक सूरज बेंद्रे तपास करत आहेत.
गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची २१ लाखांची फसवणूक – शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एका महिलेची २१ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका महिलेने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ३९ वर्षीय महिला औंधमधील एका सोसायटीत राहतात. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर मेसेज पाठवला. या मेसेजमध्ये शेअर बाजारातील विविध गुंतवणूक योजनांची माहिती देण्यात आली होती. गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष सायबर चोरट्यांनी महिलेला दाखवले. महिला चोरट्यांच्या आमिषाला बळी पडल्या. चोरट्यांनी त्यांना एका बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. त्यांनी महिनाभरात चोरट्यांच्या खात्यात २१ लाख २० हजार रुपये जमा केले. रक्कम जमा केल्यानंतर चोरट्यांनी महिलेला परतावा दिला नाही. तसेच, गुंतवलेली रक्कमही परत केली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे फिर्याद दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे तपास करत आहेत.
