आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

अपशब्द वापरल्याच्या गैरसमजातून तरुणाचा खून

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • October 12, 2026
Spread the love

पुणे : पैसे परत देण्यावरून झालेल्या वादात मध्यस्थी करणाऱ्या तरुणाने आईविषयी अपशब्द वापरल्याच्या गैरसमजातून तिघांनी तरुणाच्या डोक्यात सपासप वार करून त्याचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना सुतारवाडी येथील आयटीआय मैदानाच्या गेटजवळ रविवारी रात्री साडेअकरा वाजता घडली.

सहदेव रामप्रकाश शर्मा (वय ३३, रा. कल्याण रेसिडन्सी, शिवालय सोसायटी, साई चौक, पाषाण) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

त्यांचा भाऊ कृष्णा रामप्रकाश शर्मा (वय ३६, रा. सुसगाव) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी बंटी ऊर्फ आशिष चक्रनारायन व त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना रविवारी रात्री साडेअकरा वाजता सुतारवाडी येथील आयटीआय ग्राउंडच्या गेटबाहेर घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा लहान भाऊ सहदेव शर्मा हा शेअर मार्केटिंगचे काम करतो.

ज्ञानेश्वर भोईन याने बंटी ऊर्फ आशिष चक्रनारायन याच्याकडून तीन लाख रुपये घेतले होते. ज्ञानेश्वर हे पैसे परत करत नव्हता. त्यावरून दोघांचा मित्र सहदेव हा मध्यस्थी करत होता.

अशातच सहदेवने बंटी याच्या आई व पत्नीबाबत अपशब्द वापरले, असा गैरसमज झाल्याने बंटीने सहदेवला मारण्याची धमकी दिली होती.

सहदेव आणि ओंकार डोईफोडे हे रविवारी रात्री उशिरा फिरण्यासाठी पाषाण येथील साई चौकात गेले होते. त्यावेळी तेथे बंटी व त्याचे दोन साथीदार अचानक आले.

बंटीने त्यांना आयटीआय ग्राउंडच्या गेटबाहेर चर्चा करण्यासाठी येण्यास सांगितले. त्यानुसार ते तेथे गेले. बंटी व त्याचे दोन साथीदारही तेथे आले.

बंटीने सहदेवला, ‘तू माझ्या पत्नी व आईबद्दल अपशब्द का वापरलेस?’ असे विचारले. त्यावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. त्यामुळे बंटी व त्याच्या दोन साथीदारांनी सहदेवला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.

सहदेवने प्रतिकार केला असता बंटीने कमरेला लावलेला कोयता काढून सहदेवच्या छातीवर, डोक्यावर व शरीराच्या इतर भागांवर सपासप वार केले.

त्याच्या हातावरही मोठी जखम झाली. सहदेव जखमी अवस्थेत रस्त्यावर पडला असता बंटी व त्याच्या दोन साथीदारांनी त्याचे हात-पाय धरून त्याला ओढत फुटपाथवर आणले. त्यानंतर पुन्हा लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

सहदेव बेशुद्ध पडल्याचे पाहून तिघेही पळून गेले. त्यानंतर सहदेवच्या मित्रांनी त्याला संचेती हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी सहदेवच्या डोक्याच्या उजव्या बाजूला तसेच डोक्याच्या मध्यभागी गंभीर जखमा झाल्याचे सांगितले.

बाणेर पोलिसांनी सुरुवातीला खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी सहदेव शर्मा यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी गुन्ह्यात खुनाचे कलम वाढवले आहे. पोलीस निरीक्षक विजय खिल्लारे तपास करत आहेत.