आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयात अभिजात मराठी भाषा सप्ताह उत्साहात

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • October 12, 2026
Spread the love

वाशी : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी संचलित कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय, वाशी येथील मराठी विभागाच्या वतीने ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. महेंद्रकुमार चंदनशिवे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर कोठावळे होते. यावेळी मराठी विभागप्रमुख प्रा. लक्ष्मण धावारे यांच्यासह विभागातील प्राध्यापक उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे प्रा. महेंद्रकुमार चंदनशिवे यांनी मार्गदर्शन करताना मराठी भाषेचा प्राचीन इतिहास, समृद्ध साहित्यपरंपरा, सांस्कृतिक योगदान आणि भाषासंवर्धनाचे महत्त्व विशद केले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे तिच्या ऐतिहासिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक वैभवाला राष्ट्रीय स्तरावर अधिक प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. हा दर्जा केवळ मराठी माणसाच्या अस्मितेचा विषय नसून मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेची आणि ऐतिहासिक वारशाची मान्यता आहे, असे त्यांनी सांगितले.

संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संत नामदेव यांसारख्या संतांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून मराठी भाषा समृद्ध केली. तसेच अनेक साहित्यिकांनी कथा, कादंबरी, कविता, नाटक आणि वैचारिक लेखनातून मराठी साहित्यविश्व समृद्ध केले आहे. नव्या पिढीने या साहित्यपरंपरेचा अभ्यास करून मराठी भाषेचे महत्त्व जाणून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करून मराठी भाषा आणि साहित्य जागतिक स्तरावर पोहोचविण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. रामेश्वर कोठावळे यांनी मराठी भाषेच्या संवर्धनात शैक्षणिक संस्थांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेविषयी प्रेम, अभिमान आणि जिव्हाळा निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी मराठी साहित्याचे नियमित वाचन करावे, लेखनाची आवड जोपासावी आणि दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा प्रभावी वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.

मराठी भाषा ही महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. तिचे जतन आणि संवर्धन करणे ही प्रत्येक मराठी भाषिकाची जबाबदारी आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये भाषिक अस्मिता, साहित्यिक जाणीव आणि सांस्कृतिक मूल्यांची रुजवण होण्यास मदत होते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

मराठी विभागप्रमुख प्रा. लक्ष्मण धावारे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या माध्यमातून मराठी भाषेचा इतिहास, साहित्यपरंपरा, अभिजात भाषेचा दर्जा, भाषासंवर्धनाची गरज आणि आधुनिक काळातील मराठी भाषेचे महत्त्व यांविषयी जनजागृती करण्यात आली.

या कार्यक्रमाला मराठी विभागातील प्रा. डॉ. जयप्रकाश चोरघडे, प्रा. डॉ. आण्णासाहेब सोनवणे, प्रा. प्रेरणा पाटील आणि प्रा. मंजुषा पाटील उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. जयप्रकाश चोरघडे यांनी केले. सानिका कारंडे आणि आकांक्षा शिरसागर यांनी सूत्रसंचालन केले, तर निकिता जगताप यांनी आभार मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.