आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

ड्रेनेजच्या खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • October 19, 2026
Spread the love

पुणे : महापालिकेने मलनिस्सारण वाहिनीच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. रिक्षा समोरून आल्याने ज्येष्ठ नागरिकाने खड्ड्याच्या परिसरात लावलेल्या तात्पुरत्या कठड्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी तोल जाऊन ते खड्ड्यात पडल्याची माहिती प्राथमिक चौकशीत मिळाली आहे. ही घटना येरवड्यातील चित्रा चित्रपटगृह परिसरात घडली.

प्रदीप लक्ष्मण परदेशी (वय ६९, रा. येरवडा) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवड्यातील चित्रा चित्रपटगृहासमोरील चौकात महापालिकेने मलनिस्सारण वाहिनीच्या कामासाठी खड्डा खोदला आहे.

या खड्ड्याच्या बाजूला तात्पुरते कठडे लावण्यात आले आहेत. शनिवारी (१७ ऑक्टोबर) दुपारी परदेशी हे येरवड्यातील भाजी मंडईकडे निघाले होते.

त्या वेळी समोरून रिक्षा आली. परदेशी हे ड्रेनेजसाठी खोदलेल्या खड्ड्याच्या परिसरात लावलेल्या कठड्याजवळ थांबले. अचानक समोरून रिक्षा आल्याने परदेशी यांनी कठड्याला धरून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला.

त्या वेळी त्यांचा तोल गेल्याने ते खड्ड्यात पडले. या घटनेत परदेशी गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती शनिवारी सायंकाळी येरवडा पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच, पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. “परदेशी यांच्या पार्थिवावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

परदेशी कुटुंबीयांनी याबाबतची तक्रार पोलिसांना दिली असून, या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे,” अशी माहिती लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमर कदम यांनी दिली.