दांडिया खेळताना धक्का लागल्याने डोक्यात घातला दगड
वडगाव शेरीतील घटना : चौघे जण जखमी, पोलिसांनी दोघांना केली अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : दांडिया खेळत असताना चुकून धक्का लागल्याने दोन गटांत वाद झाला. या वादातून चौघांनी एका तरुणाला मारहाण करून त्याच्या डोक्यात दगड घातल्याने तो गंभीर जखमी झाला. या हाणामारीत दोन आरोपीही जखमी झाले आहेत.
याबाबत सुनिता शशिकांत ब्रह्माणे (वय ४२, रा. शिवशक्ती सोसायटी, सोमनाथनगर, वडगाव शेरी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यावरून पोलिसांनी आर्यन गौतम गायकवाड (वय १९) आणि अनुराज संजय खुडे (वय १९, दोघे रा. आंबेडकर वसाहत, चंदननगर) यांना अटक केली असून, त्यांच्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेत अनिकेत शशिकांत ब्रह्माणे (वय १८), विकास शिंदे आणि नितीन धोंडे हे तिघे जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही घटना वडगाव शेरी येथील ब्रह्मासन सिटीकडून सैनिकवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील बेलमॅक सोसायटीच्या बाहेरच्या प्रवेशद्वारासमोर १७ ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा अनिकेत आणि आरोपी दांडिया खेळत होते. त्यावेळी अनिकेतचा विकास शिंदे याला धक्का लागला.
यावरून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर चौघा आरोपींनी अनिकेत आणि त्याचा मित्र तौफिक यांना अडवून शिवीगाळ केली व हाताने मारहाण केली.
अनिकेतच्या डोक्यात दगड घालून त्याला गंभीर जखमी केले. या हाणामारीत विकास शिंदे आणि नितीन धोंडे हेही जखमी झाले असून, त्यांच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सहायक पोलीस निरीक्षक समीर अभंग तपास करीत आहेत.
