ज्येष्ठ नागरिकाची २५ लाखांची फसवणूक
फायनान्स कंपनीत संचालक करण्याचे आमिष : स्मित फायनान्शियल कंपनीच्या दोन संचालकांवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : फायनान्स कंपनीत ठेवी ठेवल्यास मुलाला कंपनीचा संचालक बनवतो, असे आमिष दाखवून २५ लाख रुपये घेतले. मात्र, कोणताही परतावा न देता तसेच मुलाला संचालक न बनवता एका ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी स्मित फायनान्शियल अँड इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या दोन संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एरंडवणे येथील एका ६३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी राम रामचंद्र भाटले (रा. पाम बिल्डिंग, प्राणाय गार्डन, बदलापूर) आणि रोशनी झुनझुनवाला या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०२४ पासून आतापर्यंत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा मुंबई येथे सिनेमॅटोग्राफर म्हणून काम करतो. स्मित फायनान्शियल अँड इन्व्हेस्टमेंट कंपनीचे संचालक राम भाटले आणि रोशनी झुनझुनवाला यांनी फिर्यादी यांच्या मुलाला कंपनीत संचालक बनविण्याचे तसेच फिर्यादी यांनी कंपनीत ठेवलेल्या ठेवींची शेअर बाजारात ट्रेडिंग करून त्यावर परतावा देण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार फिर्यादी आणि त्यांच्या मुलाने कंपनीत २५ लाख रुपयांची ठेव ठेवली.
भाटले यांनी फिर्यादी यांच्या मुलाला संचालक म्हणून नियुक्त केल्याचे १२ मे २०२५ रोजीचे बनावट पत्र मोबाईलवर पाठवले. मात्र, भारत सरकारच्या संकेतस्थळावर तपासणी केली असता, त्यामध्ये केवळ राम भाटले आणि रोशनी झुनझुनवाला यांचीच संचालक म्हणून नावे असल्याचे दिसून आले. याबाबत विचारणा केली असता, भाटले यांनी मुलाला संचालक करण्याचा पुन्हा विश्वास दिला.
जानेवारी २०२६ पासून फिर्यादी यांनी परतावा किंवा नफा देण्याबाबत विचारणा करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी काही दिवसांत काम होईल, असे सांगितले. मात्र, वेगवेगळी कारणे सांगून पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर त्यांनी फोन घेणे आणि संदेशांना उत्तर देणेही बंद केले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक जगताप तपास करीत आहेत.
