आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

खरेदीखत करून देऊन जमिनीचा ताबा न देणाऱ्या वकिलाविरुद्ध गुन्हा दाखल

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • November 20, 2026
Spread the love

पुणे : सणसवाडी येथे ४ लाख रुपये प्रति गुंठा या दराने जमीन विक्री करून २१ जणांना रजिस्टर खरेदीखत करून दिले. मात्र, त्यानंतर जमिनीचा ताबा न देता फसवणूक केल्याच्या आरोपावरून वाघोलीतील एका वकिलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत रोजी विरण नेसमणी (वय ५०, रा. खडकी बाजार) या महिलेने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी भगवान मारुती कोलते (रा. गाळा कॉम्प्लेक्स, वाघोली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १३ जानेवारी २०२३ पासून आतापर्यंत घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवान कोलते यांनी खडकी भागात घरकुल बांधणीसाठी सणसवाडी येथे जागेबाबत पत्रके वाटली होती. त्यावरून फिर्यादी आणि इतर महिला वाघोली येथील कार्यालयात गेल्या होत्या. कोलते यांनी त्यांना जागेवर नेले. त्यांनी जमिनीचा दर ४ लाख रुपये प्रति गुंठा असल्याचे सांगितले. त्यानुसार लोकांनी त्यांना हप्त्याहप्त्याने पैसे दिले.

त्यानंतर त्यांना खरेदीखत करून देण्यास सांगितले. सुरुवातीला त्यांनी टाळाटाळ केली. त्यानंतर १३ जानेवारी २०२३ रोजी २१ जणांना तळेगाव ढमढरे येथे बोलावले. तेथे फिर्यादीसह अन्य २१ जणांना खरेदीखत करून दिले. त्यानंतर सर्वांनी जागेचा ताबा देण्यास सांगितले. मात्र, त्यांनी पुन्हा टाळाटाळ केली.

त्यानंतर जागेचा ताबा देण्यास वेळ लागेल, असे सांगून मे २०२६ मध्ये त्यांनी संबंधितांना १ लाख रुपये परत दिले. मात्र, त्यानंतरही कोलते यांनी जागेचा ताबा दिला नाही किंवा उर्वरित पैसे परत केले नाहीत. तसेच, लोकांना भेटण्यासही टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पुण्यातील सहा महिलांची २४ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भगवान कोलते यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक रमेश साबळे तपास करीत आहेत.