१००० समाजबांधवांनी घेतला सहभाग
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : गेली ३७ वर्ष जैन श्वेतांबर गुजराती समाजातील विवाहोत्सुक मुलामुलींना अपेक्षित जोडीदार मिळावा याकरिता सलगरित्या कार्य करणाऱ्या पुण्यातील जैन वधुवर परिचय संस्थेचा १९ वा उच्चशिक्षित वधुवर परिचय मेळावा १६ जुन रोजी पुण्यात नंदु भवन येथे उत्साहात पार पडला. यामध्ये महाराष्ट्र व इतर राज्यातील मुलेमुली व त्यांचे पालक अशारीतीने १००० समाजबांधवांनी सहभाग घेतला होता.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे प्रमोद जव्हेरचंद शहा यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व वधुवर परिचय पुस्तिकेच्या प्रकाशनाने करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष दिलीप मेहता यांनी सांगितले शिक्षण, उद्योग, व्यवसायाच्या निमित्ताने समाज विखुरला गेलेला आहे.
विभक्त व मर्यादित कुटुंब पध्दती यामुळे वयात आलेल्या मुलामुलींकरीता अपेक्षित जोडीदाराची माहिती मिळणे दुरापास्त होऊ लागले आहे व अशावेळी समाजातील विवाहोत्सुक मुलामुलींची माहीती एकत्र करुन, परिचय पुस्तिका व परिचय मेळावे याद्वारे उपलब्ध करून देण्याचे काम गेली ३८ वर्ष पुण्याची जैन वधुवर परिचय संस्था करीत आहे व या माध्यमातून आजपर्यंत हजारो विवाह जमले आहेत.
शिक्षण, करियर, उत्पन्न, वाजवी अपेक्षा या विवाहाच्या दृष्टीने गरजेच्या असल्या तरी या सर्व कारणांमुळे लग्नाच्या वयाकडे मुला मुलींकडून दुर्लक्ष होत आहे. अवाजवी अपेक्षा न ठेवता तडजोड करण्याची सवय अंगिकृत करा व आपल्या पालकांच्या विचारांनाही लग्न जमविण्याच्या प्रक्रियेत समाविष्ट करा व योग्य वयामध्येच लग्न करा अन्यथा विवाहसंस्था व कुटुंब व्यवस्था विस्कळीत झालेल्या दिसतील असे मत याप्रसंगी मेहता यांनी व्यक्त केले.
या दरम्यान हास्ययोगा ट्रेनर व मोटिव्हेशनल स्पिकर मकरंद टिल्लु यांनी हास्ययोगाद्वारे योग्य वयात सकारात्मक राहुन तणावमुक्त वातावरणात मेळाव्याच्या माध्यमातून अपेक्षित जोडीदार निवडण्याबाबत विविध उदाहरणे देत त्यांच्या स्टाईलने प्रबोधन केले. प्रमुख पाहुणे मकरंद टिल्लु यांचा सन्मान संस्थेचे उपाध्यक्ष राजीव शहा व खजिनदार प्रदिप शहा यांच्या हस्ते करण्यात आला.
या मेळाव्यात प्रथम सत्रामध्ये उपस्थित उपवर मुला मुलींनी स्वत:चा परिचय करुन दिला. दुस-या सत्रामध्ये पसंतीस ऊतरलेल्या जोडीदार व त्यांच्या पालकांबरोबर समोरासमोर माहीती आदानप्रदान केली. समारोपामध्ये अनेक पालकांनी मेळाव्याच्या उत्कृष्ट आयोजनाबाबत संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद दिले.
संस्थेचे सेक्रेटरी सागर शहा यांनी आभार मानले.याप्रसंगी जैन समाजातील अनेक मान्यवर, सल्लागार, राज्यातील विविध शहरांमधील संस्थेचे स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते.
