पुणे जिल्हा स्थानकवासी जैन संघाची बैठक संपन्न; ६३ संघांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
२२ ऑक्टोबरला लोणावळा परिसरातील जैन स्थानकांना भेटी; २१ नोव्हेंबरला वडगाव शेरी जैन स्थानकात वार्षिक सर्वसाधारण सभा
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : पुणे जिल्हा स्थानकवासी जैन संघाच्या वतीने पुणे जिल्ह्यातील ६३ जैन संघांच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक वर्धमान प्रतिष्ठान येथे उत्साहात संपन्न झाली. या बैठकीत जैन समाजाचे संघटन अधिक मजबूत करणे, समाजातील विविध उपक्रमांना गती देणे तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समाजाला एकत्र जोडणे अशा विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
सकल जैन समाजाचे संस्थापक अध्यक्ष विजयकांत कोठारी, पुणे जिल्हा स्थानकवासी जैन संघाचे अध्यक्ष विलास राठोड, सचिव सागर सांखला, कार्याध्यक्ष अनिल नहार आणि खजिनदार प्रमोद लुंकड यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली.
या बैठकीला पुणे जिल्ह्यातील ६३ जैन संघांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजाची एकजूट, संघटनात्मक मजबुती आणि डिजिटल माध्यमातून समाजाला जोडण्याच्या उपक्रमावर विशेष भर देण्यात आला.
स्थानकवासी जैन समाजासाठी स्वतंत्र मोबाईल ॲप
या बैठकीत स्थानकवासी जैन समाजासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष मोबाईल ॲपची माहिती देण्यात आली. या ॲपच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील सर्व स्थानकवासी जैन समाजाचा डेटा संकलित करण्यात येणार आहे. समाजातील विविध संघांची माहिती एकाच डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध करून देत समाजातील परस्पर संपर्क आणि समन्वय वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.
२२ ऑक्टोबरला लोणावळा परिसरातील जैन स्थानकांना भेटी
पुणे जिल्ह्यातील विविध जैन संघांमध्ये समन्वय वाढविण्याच्या उद्देशाने २२ ऑक्टोबर रोजी लोणावळा व परिसरातील विविध जैन स्थानकांना संघाचे पदाधिकारी भेट देणार आहेत. या दौऱ्यात स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून संघटनात्मक विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.
२१ नोव्हेंबरला वडगाव शेरी येथे एजीएम
पुणे जिल्हा स्थानकवासी जैन संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) २१ नोव्हेंबर रोजी वडगाव शेरी येथील जैन स्थानकात आयोजित करण्यात येणार आहे. या सभेत संघाच्या कार्याचा आढावा, आगामी उपक्रम आणि समाजाच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.
