विविध माध्यमांतून शुभेच्छांचा वर्षाव
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : भारतीय जैन संघटनेचे (बीजेएस) संस्थापक आणि ज्येष्ठ समाजसेवक शांतिलाल मुथ्था यांचा ७०वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी त्यांच्या पत्नी सरला मुथ्था, सून नेहा मुथ्था, मुलगी सोनाली चोरडिया, नात आर्या चोरडिया, नातू नील मुथ्था आदी कुटुंबिय तसेच संस्थेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. विविध क्षेत्रांतील मान्यवर, देशभरातील बीजेएस कार्यकर्ते, कुटुंबिय, हितचिंतक यांनीही विविध माध्यमांतून त्यांच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव केला.
संस्थेच्या कार्यालयात आयोजित केलेल्या खास कार्यक्रमात सर्व कर्मचार्यांनी पोस्टरद्वारे लिखित संदेश देऊन त्यांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या. एमडी कोमल जैन यांनी सुंदर कविता सादर करून शुभेच्छा दिल्या व गौरी कुलकर्णी यांनी गीत सादर केले तर मोतीराम पौळ यांनी शांतिलाल मुथ्था यांच्या जीवनावरील लिहिलेले रॅप गीत सादर करून त्यांचा जीवनपट मांडला.
बीड जिल्ह्याच्या दुर्गम भागातील डोंगरकिनी या गावात १५ ऑगस्ट १९५४ साली एका सामान्य जैन कुटुंबात शांतिलाल मुथ्था यांचा जन्म झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत त्यांनी समाजातील प्रश्नांवर काम करण्यासाठी स्वत:ला झोकून दिले.
त्यासाठी भारतीय जैन संघटना व शांतिलाल मुथ्था फाउंडेशन या सामाजिक संस्थाची स्थापना केली. भारतीय जैन संघटना ही १९८५ पासून सामाजिक-कौटुंबिक प्रश्न, आपत्ती प्रतिसाद व व्यवस्थापन, जलस्त्रोत विकास व व्यवस्थापन कार्य करते.
तर शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे शालेय स्तरावर मूल्य शिक्षण रुजवण्याचे क्रांतिकारी कार्य अविरतपणे सुरू आहे. जल संवर्धन, जल व्यवस्थापन या क्षेत्रांत बीजेएस चे कार्य देशपातळीवर पोहोचले असून अनेक राज्य सरकार, केंद्र सरकार, नीती आयोग यांनी विशेष दखल घेतली आहे.
बीजेएस ने ‘तलावांचे पुनरुज्जीवन’ करण्याचे परिपूर्ण मॉडेल विकसित केले असून या क्षेत्रातील देशपातळीवरील ब्रॅंड ठरला आहे. शांतिलाल मुथ्था यांचे चार दशकांपासून सुरू असलेले कार्य आणि देशासाठी दिलेले योगदान निश्चितच अमूल्य आहे.