आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

आत्म्याचे आध्यात्मिक पोषण केल्यास होईल मोक्ष प्राप्ती : प.पु. श्री सुप्रियदर्शनाजी म.सा.

Spread the love

पुणे : मानवी जीवनाचा सदुपयोग करून आत्म्याचे आध्यात्मिक पोषण केल्यास मोक्ष प्राप्ती होऊ शकते, असे मत प.पु. श्री सुप्रियदर्शनाजी म.सा. यांनी बिबवेवाडी जैन स्थानकात प्रवचनात मार्गदर्शन करताना व्यक्त केले.

प. पु. श्री सुप्रियदर्शनाजी म. सा. म्हणाल्या, अमृतसमान मानवी जीवन हे यंत्रांवर अवलंबून झाले आहे. यंत्रे सुविधा देतात, पण सुरक्षितता देत नाहीत. यंत्रांची वारंवार नियमित निगा ठेवणे अत्यावश्यक झाले आहे. आपल्याला दुर्मिळ असे मानवी जीवन मिळाले आहे, परंतु त्याची आध्यात्मिक निगा ठेवण्याचे स्मरण आपल्याला राहत नाही.

मानवी जीवनाचा सदुपयोग करून आत्म्याचे आध्यात्मिक पोषण केल्यास मोक्ष प्राप्ती होऊ शकते. मानवी जीवनाचा सदुपयोग करण्याचे भगवान महावीर स्वामींनी तीन मार्ग सांगितले आहेत. ते असे – १) स्थान – प्रत्येक गोष्टीचे स्थान निश्चित असते. पादत्राणे पायातच शोभून दिसतात आणि टोपी किंवा पगडी डोक्यावरच शोभून दिसते. रोजच्या जीवनामध्ये स्थानानुसार व्यवहार आणि वाणीचे योग्य ताळमेळ ठेवणे आवश्यक आहे.

तीन स्थान महत्त्वपूर्ण आहेत – १. पारिवारिक स्थान – जेव्हा आपण परिवारासोबत असतो, त्यावेळी पारिवारिक विषय सोडून कोणत्याही इतर विषयावर चर्चा करू नये. २. सामाजिक स्थान – सामाजिक स्थानामध्ये धार्मिक विषय बोलल्यास इतरांना ते आवडणार नाही.

येथे सामाजिक/व्यापारी विषयावर चर्चा होणे आवश्यक आहे. ३. धार्मिक स्थान – येथे फक्त धार्मिक विषयांवर चर्चा व विचारविनिमय होणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारचे सांसारिक कार्य धार्मिक स्थानामध्ये करू नये.

२) संयोग व वियोग – संयोग आणि वियोग हे नाण्याच्या दोन बाजू आहेत. जिथे संयोग आहे, तिथे वियोगही आहे. आपण जीवनामध्ये संयोगाचा आनंद साजरा करण्याऐवजी वियोगाच्या दुःखात राहणे पसंत करतो. मानवी जीवन मिळाल्याचा आनंद साजरा करण्याऐवजी, माझ्यापेक्षा दुसऱ्याला जास्त धन मिळाल्याचे दुःख करतो.

३) वेळ – वेळ अतिशय महत्त्वाची आहे. एकदा निघून गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही. त्यामुळे वेळेचा सदुपयोग करणे गरजेचे आहे. योग्य कामासाठी योग्य वेळेचा वापर केल्यास मानवी जीवन सार्थक होऊ शकते. फक्त मानवी जीवनामधूनच मोक्ष प्राप्ती होऊ शकते. प्रत्येक आत्म्यामध्ये परमात्मा बनण्याचे गुण आहेत.

त्यासाठी मनुष्य जन्म, योग्य सत्संग, आणि वेळेचा योग्य वापर यांचा मेळ बसवणे महत्त्वाचे आहे. आपल्याला मनुष्य जन्म मिळाला आहे, तर त्याचा योग्य वापर करून जीवन सार्थक करायला पाहिजे.

भगवान महावीर स्वामी म्हणतात, जो भावनेने जागृत असतो तो सदैव जागा असतो, त्यालाच मुनी मानतात. जो अजागृत असतो, त्याला सदैव झोपलेला समजावे. मानसिक आणि आध्यात्मिक ऊर्जा एकत्रित केल्यावर नियमांचे अधिक दृढतेने पालन करणे शक्य होते.