जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाला १०० कोटींचा निधी
राष्ट्रीय महामंडळाकडून निधी : नवी दिल्ली येथे सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या
महाराष्ट्र जैन वार्ता
नवी दिल्ली : महाराष्ट्र शासनाच्या जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाने भारत सरकारच्या राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळ (NMDFC) सोबत सामंजस्य करार (MoU) केला असून, या कराराअंतर्गत महामंडळाला तब्बल १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे.
या निधीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जैन समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज, तसेच नवउद्योजक युवकांना व्यवसाय उभारणीसाठी आवश्यक आर्थिक सहाय्य उपलब्ध होणार आहे.
त्यामुळे जैन समाजाच्या शैक्षणिक आणि आर्थिक सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार आहे. या सामंजस्य करारावर जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, व्यवस्थापकीय संचालक मेघना शिंदे आणि राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळाचे महाव्यवस्थापक अनिल कुमार यांनी राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळाच्या अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक आभा रानी सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वाक्षऱ्या केल्या.
यावेळी जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे समन्वयक संदीप भंडारी, विकास आच्छा, विपिन जैन तसेच राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळाचे जीएम (फायनान्स) कुमार सुदेश, जीएम (प्लॅनिंग) निक्सन माथुर, जीएम (अकाउंट्स) मनोज पुनिया आणि डीजीएम पी. एस. पौणीकर उपस्थित होते.
या करारामुळे जैन समाजातील अल्प उत्पन्न गटातील विद्यार्थी आणि युवा नवउद्योजकांना शासकीय आर्थिक योजनांचा अधिक व्यापक लाभ मिळणार असून, महाराष्ट्रातील जैन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.
