कोंढव्यात मुस्लिम बांधवांचा गंगाधर बधे यांना पाठिंबा
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे आमचे दैवत आहेत आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आमच्या हृदयात आहेत. आत्तापर्यंत आम्ही त्यांचे आदेश अंतिम मानले आणि महाआघाडीचा धर्म पाळत आलो. कंबर कसून शिवसैनिकांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जिंकवून दिले, पण परत, परत तेच झाले. हडपसर मतदारसंघात निष्ठावंत शिवसैनिकांना डावलण्यात आले! कुठवर दुसऱ्याच्या भाकऱ्या शिवसैनिकांनी भाजायच्या? असा रोखठोक सवाल माजी आमदार महादेव बाबर यांनी केला.
हडपसर विधानसभा मतदारसंघातील कोंढवा खुर्द-मिठानगर, भाग्योदयनगर, नवाजिश पार्क, स. नं. ४२, ४३, शिवनेरीनगर, गावठाण आणि परिसरात अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांनी भव्य दुचाकी रॅली आणि पदयात्रा आयोजित करून मतदारांशी संवाद साधला.
या पदयात्रेत मार्गदर्शन करताना माजी आमदार महादेव बाबर बोलत होते. यावेळी विविध पक्षातील नाराज गट, अनेक संघटना, मंडळे आणि हजारो मुस्लिम बांधवांनी बधे यांना पाठिंबा दिला.
यावेळी साईबा ग्रुपचे सदस्य पदाधिकारी, शिवसेना विभाग प्रमुख राजेंद्र बाबर, माजी नगरसेवक तानाजी लोणकर, भरत चौधरी, माजी नगरसेविका मेघा बाबर, प्रसाद बाबर, नदीम शेख, सादिक पटेल, उस्मान शेख, श्रीकांत पवार, प्रदीप पवार यांच्यासह हजारो सर्वधर्मीय नागरिक पदयात्रेत सहभागी झाले होते.
आघाडी म्हणताना? मग त्याचा धर्म सगळ्यांनी पाळायला हवा. पण तसे होताना दिसत नाही. म्हणूनच मी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे, असे निष्ठावंत शिवसैनिक गंगाधर बधे यांनी सांगितले.
