महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : हडपसर विधानसभा मतदारसंघात प्रचाराची रंगत वाढू लागली आहे. मतदारसंघातील दिग्गज, निष्ठावान शिवसैनिक व माजी आमदार महादेव बाबर यांनी अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांच्या रूपाने सांगली पॅटर्न राबवण्याचा निर्धार केला आहे व बधे यांना निवडून आणण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. कोंढवा बुद्रुक परिसरामध्ये आयोजित केलेल्या पदयात्रेत स्थानिक नागरिकांनी जागोजागी उमेदवार गंगाधर बधे यांना पाठिंबा दिला.
कोंढवा बुद्रुक गावठाण, लक्ष्मी नगर, काकडे वस्ती, सर्व नंबर पाच आश्रफनगर, संत ज्ञानेश्वर नगर, कान्हा चौक, टिळेकर नगर, पाण्याची टाकी, गोकुळनगर, आणि साईनगर या ठिकाणी गंगाधर बधे यांच्या प्रचारार्थ काढलेल्या भव्य पदयात्रेचा समारोप करण्यात आला.
यावेळी माऊली कामठे, मधुकर सुकर दांडेकर, दादा दांडेकर, सचिन निंबाळकर, मधुकर मरळ, रामदास कामठे यांच्यासह अनेक नागरिक मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी झाले होते. यावेळी अनेक नागरिकांनी गंगाधर बधे यांना घरी बोलावून त्यांच्या समस्या सोडवण्याची विनंती केली.
पदयात्रेदरम्यान मतदार बाबुशेठ अडसूळ यांनी सांगितले की, गंगाधर अण्णा बधे हे मागील वीस वर्षांपासून कोंढवा परिसरात सामाजिक काम करतात. अनेक गरीब व कष्टकरी लोकांना त्यांनी मदत केली आहे. मुस्लिम असो वा हिंदू किंवा कोणत्याही धर्माचा व्यक्ती असो, सर्वांना आपल्या माणसाप्रमाणे त्यांनी मदत केली आहे. त्यामुळे गंगाधर बधे यांना या परिसरातून मोठे मतदान होईल.