निनाद नागरी सहकारी पतसंस्थेत केली होती फसवणूक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : नागरिकांना जादा परताव्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून ठेवी घेऊन मुदत संपल्यानंतर त्या परत न करता नागरिकांची १ कोटी ७९ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात विश्रामबाग पोलिसांनी भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक उदय जोशी याला अटक केली आहे.
याबाबत प्रतिभा विलास पानसे (वय ७८, रा. शोभानगर सोसायटी, सहकारनगर) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी उदय जोशी, शुभदा जोशी, मयूरेश जोशी, रामलिंग शिवणगे, अशोक कुलकर्णी, वल्लभ जोशी, माजी अध्यक्ष मिथिलेश घोलप व विलास बाम यांच्याविरुद्ध महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण (एमपीआयडी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उदय जोशी याची पत्नी शुभदा जोशी याही नगरसेविका होत्या. फिर्यादी यांचे पती सेवानिवृत्त असून पेन्शनवर कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालतो. उदय जोशी हा निनाद पतसंस्थेचा अध्यक्ष आहे. फिर्यादी व उदय जोशी एकमेकांच्या परिचयाचे आहेत.
आरोपींनी पानसे यांना आमिष दाखविले की, तुम्ही जर आमच्या पतसंस्थेत ठेव ठेवली तर बँकेपेक्षा जादा व्याज देऊ, तसेच ज्येष्ठ नागरिकांना एक टक्का जास्त व्याज देतो, असे सांगितले. त्यानुसार पानसे यांनी त्यांचे पैसे मुदत ठेवीत ठेवले होते.
मुदत संपल्यानंतर त्या सदाशिव पेठेतील पतसंस्थेच्या कार्यालयात गेल्या होत्या. त्यांना मुद्दल परत करण्याऐवजी उदय जोशी याने हकलून दिले होते. भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक उदय त्र्यंबक जोशी व त्यांचा मुलगा मयुरेश जोशी यांच्यावर वेगवेगळे फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.
त्यांची गॅस एजन्सी होती. त्यात गुंतवणुक करायला लावून त्याने अनेकांची फसवणूक केली होती. एका ठेकेदारासह ९ जणांची ५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल आहे.
विश्रामबाग पोलिसांनी उदय जोशी याला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग वाघमारे तपास करीत आहेत.
