वाहंनाची तोडफोड करुन तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : आपली दहशत निर्माण करण्यासाठी गुंडांच्या टोळक्याने लोहगावमधील कलवड वस्ती, धानोरी जकात नाका परिसरात वाहनांची तोडफोड करुन तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तेथील ५ दुचाकी, रिक्षा, दुकानाचे काऊंटर यांची तोडफोड करुन दहशत पसरविली.
याबाबत संदिप नंदकुमार आढाव (वय ३५, रा. जाधवनगर, विश्रांतवाडी) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी निकेलश पाटील (वय २१, रा. खंडोबानगर) याला अटक केली आहे.
अक्षय संजय सगळगिळे (वय २०, रा. संतनगर, लोहगाव) आणि एका अल्पवयीन मुलावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कलवड वस्ती येथील स्वामी समर्थ नगर तसेच धानोरी जकात नाका येथे गुरुवारी रात्री साडेअकरा वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय सगळगिळे याच्या गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी त्याच्यावर गेल्या वर्षी मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. फिर्यादी हे त्यांच्या दुकानासमोर मित्रासोबत गुरुवारी रात्री गप्पा मारत बसले होते. त्यावेळी हे टोळके तेथे आले.
त्यांनी फिर्यादी यांना कोयत्याने मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला़ त्यांचे दुकान तसेच त्यांच्या दुकानाशेजारील ज्वेलर्सचा बोर्ड त्यांनी तोडला. तेथील ५ दुचाकींवर कोयता व दगडाच्या सहाय्याने नुकसान केले. तसेच धानोरी जकात नाका येथील एक क्रेटा कार, एक रिक्षा व ३ दुचाकी गाड्यांचे नुकसान केले.
कलवड वस्तीतील गणराज चौकातील केदारेश्वर मेडिकलचे काऊंटर, फ्रिजची काच फोडली. चायनीज सेंटरचे नुकसान केले. चायनीज सेंटरचे मालक सलीम बागवान व त्यांचा मुलगा अदियान बागवान यांना दगड फेकून मारुन जखमी केले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त संदिपसिंग गिल, रंगनाथ उंडे, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, अजय संकेश्वरी, राजेंद्र पन्हाळे यांनी घटनास्थळी भेट घेऊन तपासाबाबत सूचना केल्या. सहायक पोलीस निरीक्षक सचिन धामणे तपास करीत आहेत.
