नायलॉन मांजा विक्री करणार्या दुकानावर पोलिसांची धाड
पुणे : संक्रांतीचा सण जवळ आला की, पतंगबाजीची धामधूम सुरु होते. पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणारा नायलॉन किंवा चिनी मांजा जीविताला गंभीर धोका निर्माण करतो. त्यामुळे यावर बंदी घालण्यात आली आहे. असे असूनही नायलॉन मांजामुळे गळा कापून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. परंतु, या विक्रीतून मिळणाऱ्या पैशांसाठी काहीजण जीवाचा विचार न करता नायलॉन मांज्याची विक्री करीत असल्याचे आढळून आले आहे. यामुळे बिबवेवाडी, विश्रांतवाडी आणि जनवाडी येथील तीन दुकानांवर पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली आहे.
बिबवेवाडीतील बालाजीनगर परिसरातील के. के. मार्केटमध्ये नायलॉन मांज्याची विक्री होत असल्याचे आढळून आले. या प्रकरणी पोलीस अंमलदार महेश मंडलीक यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार राहुल शाम कांबळे (वय १९, रा. भवानी मंदिराजवळ, बिबवेवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जनवाडीतील जय भवानी मित्र मंडळाच्या जवळ असलेल्या बांगड्या विक्रीच्या दुकानातही नायलॉन मांज्याची विक्री होत असल्याचे आढळले. या प्रकरणी पोलिसांनी इलियास सलीम शेख (वय ४२, रा. जनता वसाहत, जनवाडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
विश्रांतवाडीतील कळस परिसरातील विशाल गजानन डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये विविध रंगांचा कृत्रिम लेप असलेला नायलॉन मांजा विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलिसांनी मयुर महादेव अनासने (वय ३४, रा. कळस, विश्रांतवाडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. जिविताला धोका देणाऱ्या अशा प्रकारच्या मांज्याची विक्री थांबवण्यासाठी कठोर कारवाईची गरज आहे, असे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

 
			

















