त्यात माहिती भरुन पाठवू नका, ती सायबर चोरट्यांची असू शकते
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : सायबर चोरट्यांकडून नागरिकांची फसवणूक करण्यासाठी नवनवीन फंडे वापरले जात आहेत. बँक किंवा इतर वित्तीय संस्थांच्या नावाखाली अनोळखी व्यक्ती फोन करून तुमची गोपनीय माहिती घेतात, तुमच्या खात्यांवर हल्ला करतात, आणि लाखो रुपयांची फसवणूक करतात. नागरिकांमध्ये जागरूकता नसल्याने या प्रकारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.
पुण्यातील एका नागरिकाला पंजाब नॅशनल बँकेच्या नावाखाली फोन आला. त्यांना सांगण्यात आले की त्यांचे डेबिट कार्ड ब्लॉक झाले आहे आणि ते पुन्हा सुरू करण्यासाठी व्हॉट्सअॅपवर पाठवलेल्या “एपीके” फाईलमधील फॉर्म भरावा लागेल. खात्री करण्यासाठी त्यांनी एटीएममध्ये कार्ड स्वाइप केले तेव्हा कार्ड ब्लॉक असल्याचे दिसले.
त्यामुळे त्यांनी चोरट्यांनी पाठवलेला फॉर्म भरला. त्यानंतर त्यांचे खाते रिकामे झाले, आणि जवळपास १९ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक झाली. कोरेगाव पार्क येथील ५१ वर्षीय व्यक्तीचे सीम कार्ड अचानक बंद पडले. चोरट्यांनी त्यांचा मोबाईल अॅक्सेस घेऊन त्यांच्या नावाने २४ लाख ८२ हजार रुपयांचे कर्ज मंजूर केले. तसेच, त्यांच्या खात्यातून २२ लाख ८० हजार रुपये काढले.
एका ४० वर्षीय इंजिनिअरला फोन करून आयसीआयसीआय बँकेच्या नावाने क्रेडिट कार्ड डिटेल्स भरायला सांगितले. चोरट्यांनी पाठवलेल्या “एपीके” फाईलमध्ये माहिती भरल्यावर त्यांच्या खात्यातून ३ लाख २० हजार रुपये चोरीला गेले. शिवाजीनगर येथील व्यावसायिकाला अमेरिकन एक्सप्रेस क्रेडिट कार्डवर फ्रॉड ट्रान्झेक्शन झाल्याचे सांगून नवीन कार्ड देण्यात आले.
मात्र, ते अॅक्टिवेट करण्यापूर्वीच त्यांच्या कार्डवरून ११ लाख ६९ हजार रुपयांचे व्यवहार झाले.
फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी नागरिकांनी स्वतःहून काळजी घेतली पाहिजे. आपल्या पैशांची सुरक्षा ही आपली जबाबदारी आहे. सतर्क राहा, सायबर साक्षर व्हा आणि फसवणूक टाळा.
सायबर फसवणुकीपासून बचावासाठी महत्त्वाचे उपाय
• अनोळखी फोनवर विश्वास ठेवू नका.
• बँका कधीही फोन किंवा व्हॉट्सअॅपवरून माहिती मागवत नाहीत.
• कोणी फाईल पाठवली तर ती डाऊनलोड करू नका.
• बँकेशी संपर्क साधताना अधिकृत नंबर किंवा शाखेचा प्रत्यक्ष दौरा करा.
• गुगलवर मिळालेल्या नंबरवर विश्वास ठेवू नका, पासबुकवरील नंबर वापरा.
• बँक अॅप किंवा अधिकृत वेबसाईटवरूनच व्यवहार करा.















