डॉ. अश्विन पोरवाल : वैद्यकीय क्षेत्रात नवा इतिहास
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : फिस्टुला (भगंदर) हा त्रासदायक आणि पुनरावृत्ती होणारा आजार असून, त्यावर प्रभावी उपचार शोधणे हे वैद्यकीय क्षेत्रासाठी एक मोठे आव्हान होते. मात्र, पुण्यातील प्रसिद्ध कोलोनरेक्टल सर्जन डॉ. अश्विन पोरवाल यांनी यावर क्रांतिकारी उपाय शोधून काढला आहे.
त्यांनी विकसित केलेल्या ‘BEST Device’ (Balloon Expansion and Separation Technique) या तंत्रज्ञानाला पाच वर्षांसाठी पेटंट मिळाले असून, हे भारतातील फिस्टुलाच्या उपचारांसाठी पेटंट मिळालेले पहिले उपकरण ठरले आहे.
हे उपकरण फिस्टुला शस्त्रक्रियांसाठी अधिक प्रभावी, सुरक्षित आणि पुनरावृत्ती टाळण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे पारंपरिक शस्त्रक्रियांमधील त्रुटी दूर होऊन रुग्णांना वेगवान आणि वेदनारहित उपचार मिळू शकतील.
या त्रासांमुळे रुग्णांचे दैनंदिन जीवन प्रभावित होते. पारंपरिक उपचारांनंतरही ६०% रुग्णांमध्ये फिस्टुला पुन्हा होण्याची शक्यता असते, त्यामुळे अधिक प्रभावी उपाय आवश्यक होता.
फिस्टुला म्हणजे काय आणि तो का घडतो ?
फिस्टुला म्हणजे गुदद्वाराजवळ तयार होणारी संसर्गयुक्त नळी, जी त्वचेच्या आत आणि बाहेर जोडली जाते. या नळीमधून पस बाहेर पडतो आणि योग्य उपचार न केल्यास हा आजार अधिक क्लिष्ट होतो.
फिस्टुलाचे प्रमुख प्रकार –
सिंपल फिस्टुला : गुदद्वाराजवळ छोट्या मार्गाने तयार होतो.
कॉम्प्लेक्स फिस्टुला: अनेक मार्ग (tracts) असतात, जे गुदद्वाराच्या स्नायूमधून किंवा इतर भागांपर्यंत पोहोचतात.
रेक्टोव्हजायनल फिस्टुला: स्त्रियांमध्ये योनीमार्ग व गुदद्वार यामधील मार्ग तयार होतो.
रेक्टोस्क्रोटल फिस्टुला: पुरुषांमध्ये स्क्रोटमपर्यंत ट्रॅक्ट जातो.
फिस्टुलाची लक्षणे –
१) गुदभागाच्या ठिकाणी सतत वेदना व सूज.
२) फोड किंवा गाठ तयार होणे.
३) पस किंवा रक्तस्त्राव.
४) सतत जळजळ व अस्वस्थता.
५) ताप आणि अशक्तपणा.
‘BEST Device’ – फिस्टुलाच्या उपचारातील क्रांतिकारी शोध – डॉ. अश्विन पोरवाल आणि त्यांच्या संशोधन संघाने हीलिंग हँड्स क्लिनिकमध्ये फिस्टुलाच्या पुनरावृत्तीचे प्रमुख कारण ओळखले – “प्री-मॅच्युअर क्लोजर”. यावर उपाय म्हणून ‘BEST Device’ विकसित करण्यात आले, जे जगातील पहिले अशा प्रकारचे उपकरण आहे.
या तंत्रज्ञानाची वैशिष्ट्ये –
१) मिनिमली इन्व्हेसिव्ह प्रक्रिया : शरीराला कमीत कमी त्रास देणारी शस्त्रक्रिया.
२) सेल्फ-रिटेनिंग बलून : फिस्टुलाच्या कॅविटीमध्ये ठेवून पस व्यवस्थित ड्रेन होऊ शकतो.
३) वेळेवर योग्य उपचार : रोज ड्रेसिंग करण्याची गरज राहत नाही, रुग्ण घरीच काळजी घेऊ शकतो.
४) सर्जरीनंतर कमी फॉलोअप : फक्त ३ आणि ६ आठवड्यांनी फॉलोअप आवश्यक.
५) पुनरावृत्तीचे प्रमाण अत्यंत कमी : फिस्टुला पुन्हा होण्याचा धोका ९०% पेक्षा अधिक कमी होतो.
आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता आणि पेटंट –
सन २०१९ मध्ये अमेरिकन सोसायटी ऑफ कोलोन अँड रेक्टल सर्जन्स (ASCRS), USA येथे ‘BEST Device’ सादर करण्यात आले. तेथील तज्ज्ञांनी या तंत्रज्ञानाचे भरभरून कौतुक केले आणि यामुळे भविष्यात फिस्टुलाच्या उपचारांमध्ये मोठा बदल घडेल, असे मत व्यक्त केले.
अखेर २०२५ मध्ये भारतातील हे पहिले पेटंट असलेले उपकरण म्हणून त्याला अधिकृत मान्यता मिळाली. यामुळे आता जगभरातील कोलोनरेक्टल सर्जन्स हे उपकरण उपचारांमध्ये वापरू शकतील.
रुग्णांसाठी वरदान ठरणारे संशोधन –
या तंत्रज्ञानामुळे आता रुग्णांना जलद, सुरक्षित आणि वेदनारहित उपचार मिळतील. यामुळे पारंपरिक शस्त्रक्रियांमध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतील आणि रुग्णांना कमी त्रास होऊन अधिक चांगले परिणाम मिळतील.
डॉ. अश्विन पोरवाल यांनी भारतातीलच नव्हे, तर जगभरातील हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. हे नवीन तंत्रज्ञान फिस्टुलाच्या उपचारांमध्ये नवा क्रांतिकारी टप्पा ठरणार आहे, असा विश्वास वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
