बनावट नंबर प्लेट लावून चोरीच्या गाडीसह पाषाणला आला घरी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पुणे शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले असतानाही शहरात प्रवेश करून चोरीच्या दुचाकीवरून घरी आलेल्या गुंडाला दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने अटक केली.
सोहम प्रकाश डोंगरे (वय २४, सध्या रा. गणराज सोसायटी, पाषाण, मुळ रा. सावकार चाळ, संभाजी चौक, पाषाणगाव) असे अटक करण्यात आलेल्या गुंडाचे नाव आहे. दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक कोंबिंग ऑपरेशनदरम्यान गस्त घालत असताना पोलीस अंमलदार अमित गद्रे व महेश पाटील यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, चतु:श्रृंगी पोलिसांकडील रेकॉर्डवरील व सध्या तडीपार असलेला सोहम प्रकाश डोंगरे हा पाषाणमध्ये त्याच्या घरी येणार आहे.
या माहितीनुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सापळा लावला. पाषाण येथील वीटभट्टीजवळ एक जण मोपेडसह उभा असल्याचे दिसून आले. पोलिसांना पाहून तो पळून जाऊ लागला. त्यावेळी पोलिसांनी त्याला पकडले.
सोहम डोंगरे याच्याकडील दुचाकीच्या नंबरविषयी शंका आल्याने पोलिसांनी त्यास दुचाकीविषयी विचारले. तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्याला चतु:श्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये आणले आणि वेस्पा मोपेडच्या चासी क्रमांकाची पडताळणी केली.
तपासाअंती ही मोपेड वाकड परिसरातून २०२३ मध्ये चोरीला गेल्याचे आणि वाकड पोलीस ठाण्यात त्यासंबंधी गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. सोहम डोंगरेने ही मोपेड चोरून तिची नंबर प्लेट बदलली आणि तडीपारीच्या आदेशाचा भंग करून पाषाण येथे घरी आला होता.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे, पोलीस अंमलदार अमित गद्रे, गणेश ढगे, अजित शिंदे, रवींद्र लोखंडे, महेश पाटील, नारायण बनकर यांनी केली आहे.
