महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भूम : 22 एप्रिल 2025 रोजी धाराशिव जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पूर्वतयारी संदर्भात एक महत्त्वपूर्ण आढावा व मार्गदर्शन बैठक पार पडली. या बैठकीस कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी, तालुका स्तरावरील अधिकारी, मोहिम अधिकारी तसेच कृषी निविष्ठा विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धाराशिव जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी प्रमोद राठोड यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामपूर्व नियोजनासंदर्भात महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उपविभागीय कृषी अधिकारी गुडूप, मोहिम अधिकारी गरगडे, तालुका कृषी अधिकारी अतुल ढवळे, पंचायत समिती कृषी अधिकारी (गुणनियंत्रण) महेशकुमार बिडवे, कृषी अधिकारी बळीराम शिंदे तसेच तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांचे विक्रेते उपस्थित होते.
बैठकीत खरीप हंगामासाठी आवश्यक असणाऱ्या बियाणे, खते, कीडनाशके यांची उपलब्धता, गुणवत्तेची हमी आणि वितरणाची कार्यप्रणाली यावर सखोल चर्चा झाली. कृषी अधिकाऱ्यांनी विक्रेत्यांना वेळेत व प्रमाणित निविष्ठा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना दिल्या. तसेच, नकली निविष्ठा विक्रीवर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.
प्रमोद राठोड यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, “शेतकऱ्यांपर्यंत गुणवत्तापूर्ण निविष्ठा वेळेत पोहोचणे ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे. खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्व घटकांनी समन्वयाने कार्य करणे आवश्यक आहे.”
उपस्थित विक्रेत्यांनी देखील आपल्या अडचणी व सूचना अधिकाऱ्यांसमोर मांडल्या, त्यावर समाधानकारक उत्तर देत अधिकारीवर्गाने सकारात्मक प्रतिसाद दिला.
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेली ही बैठक अत्यंत फलदायी ठरली. अशा आढावा बैठकीमुळे अधिकाऱ्यांमध्ये आणि निविष्ठा विक्रेत्यांमध्ये समन्वय वाढून शेती संबंधित सेवांचा दर्जा सुधारण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
