पुण्यातील व्यापाऱ्यास गुजरातच्या व्यापारी पितापुत्रांनी घातला ५६ लाखांचा गंडा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : उज्जैन येथील प्रसिद्ध महाकाल मंदिराच्या महंतांना देण्यासाठी २ कोटी रुपयांचे हिऱ्यांचे दागिने घेऊन ते त्यांना न देता परस्पर गहाण ठेवून पुण्यातील व्यापाऱ्यास मारहाण करून गुजरातमधील दोघा व्यापारी पितापुत्रांनी ५६ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत विवेक अमृतलाल पटेल (वय ३६, रा. मुद्रा सोसायटी, बिबवेवाडी) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी विजय ऊर्फ योगेश दशरथभाई रावल आणि पार्थ विजय ऊर्फ योगेश रावल (दोघे रा. खंभात, गुजरात) या व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार कुमठेकर रोडवरील गोपी जेम्स या दुकानात १० ऑक्टोबर २०२२ ते १५ एप्रिल २०२५ दरम्यान घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवेक पटेल यांचे कुमठेकर रोडवर गोपी जेम्स नावाचे रत्ने व खडे यांचे दुकान आहे.
त्यांच्या सासऱ्यांच्या ओळखीने विजय रावल व पार्थ रावल हे पिता-पुत्र त्यांच्याकडे आले होते. त्यांनी काही व्यवहार त्यांच्याबरोबर केले होते. त्यानंतर त्यांनी उज्जैन येथील महाकाल मंदिराच्या महंतांना काही रत्ने, खडे व दागिने हवे असल्याचे सांगून त्यांच्याकडून २ कोटी रुपयांचा माल घेऊन गेले.
१५ दिवसांनंतरही त्यांनी पैसे न दिल्याने फिर्यादी उज्जैन येथे जाऊन तेथील महंतांना भेटले. त्यांनी विजय व पार्थ रावल यांना ओळखत असल्याचे, मात्र त्यांच्याकडून कोणताही माल मिळाला नसल्याचे सांगितले.
त्यानंतर पटेल हे गुजरातमधील खंभात येथे गेले. रावल यांना भेटल्यावर त्यांनी, “तुमच्याकडून घेतलेले दागिने मी गहाण ठेवले आहेत. तुम्ही ३३ लाख रुपये दिले तर तुमचे सर्व दागिने सोडवून आणून तुम्हाला देतो,” असे सांगितले.
त्यानुसार पटेल यांनी ३३ लाख रुपयांची रोकड त्यांना दिली. त्यांनी पैसे घेऊन काही माल परत केला; मात्र अडीच लाख रुपयांची रत्ने परत केली नव्हती. शिवाय दिलेले ३३ लाख रुपयेही त्यांनी परत केले नव्हते.
त्यानंतर पटेल यांनी पुन्हा खंभात येथे जाऊन त्यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी, “आता तुम्ही ७ लाख रुपये द्या, तुमचा माल सोडवून आणतो व पैसे परत करतो, तसेच नवीन ऑर्डर देतो,” असे सांगितले. त्यानुसार पटेल यांनी आणखी ७ लाख रुपये दिले.
काही दिवस होऊनही त्यांनी ना पैसे परत केले, ना माल सोडवून परत केला. शेवटी पटेल पुन्हा खंभात येथे गेले. तेव्हा आरोपींनी पैसे व माल देण्यास नकार देत त्यांना मारहाण केली. त्यांची एकूण ५६ लाख २६ हजार रुपयांची फसवणूक झाली.
अनेक महिने वाट पाहूनही पैसे व माल परत न केल्याने अखेर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर तपास करत आहेत.

















