माजी सरन्यायाधीश उदय लळीत यांचे गौरवोद्गार : २८ व्या स्थापनादिनी सूर्यदत्त राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कारांचे वितरण
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : समाजाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना एकाच व्यासपीठावर सन्मानित करण्याची संधी म्हणजे समाजाच्या प्रबोधनाचा प्रभावी मार्ग आहे. कला, क्रीडा, विज्ञान, अर्थशास्त्र, लेखा, प्रशासन आदी विविध क्षेत्रांतील व्यक्तींचा समावेश असलेला हा समाजाचा विविधांगी प्रेरणादायी कार्यक्रम अनुभवता आल्याचे समाधान आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश उदय लळित यांनी केले.
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या २८ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ‘सूर्यदत्त राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार’ व सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार’ वितरण समारंभात उदय लळीत बोलत होते.
बाणेर येथील बंटारा भवनमध्ये झालेल्या समारंभावेळी माजी केंद्रीय निवडणूक आयुक्त टी. एस. कृष्णमूर्ती, भारतीय जनता पार्टीचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू, एअरमार्शल (निवृत्त) भूषण गोखले, ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद, एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. डॉ. शरदचंद्र दराडे, ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षित कुशल, मुख्य विकास अधिकारी सिद्धांत चोरडिया आदी उपस्थित होते.
पद्मश्री परमपूज्य आचार्य डॉ. चंदनाजी महाराज (ताई माँ) यांना ‘सूर्यदत्त ग्लोबल पीस गांधीयन फिलॉसॉफी अवॉर्ड २०२६’, तर माजी सरन्यायाधीश उदय लळित यांच्यासह ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, हास्ययोग चळवळीचे विठ्ठल काटे, माजी सनदी अधिकारी शेखर गायकवाड, अभिनेते राकेश बेदी, बांधकाम व्यावसायिक विलासकुमार पालरेषा, दिग्दर्शक सुभाष सेहगल, शिक्षणतज्ज्ञ अशोककुमार ठाकूर, शास्त्रज्ञ डॉ. आनंद भाडळकर, विधिज्ञ अॅड. प्रमोद आडकर, साहित्यिका प्रा. सुरेखा कटारिया, उद्योजक प्रकाश गांधी, जागतिक रणनीतीकर संजय पुरी यांना ‘सूर्यदत्त राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, योगसद्गुरू डॉ. कृष्णदेव गिरी, अभिनेत्री व स्टँडअप कॉमेडियन उपासना सिंग, भारतीय बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर अभिजित कुंटे, सर्वोच्च न्यायालयातील वकील अॅड. आशुतोष श्रीवास्तव, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सुरेंद्रा कुमारी, योग प्रशिक्षक राखी गुगळे, अवकाशशास्त्रज्ञ डॉ. कनक सहा, बासरीवादक पारस नाथ, ग्लोबल युथ अँबेसेडर दारासिंग खुराणा, डॉ. प्रमोद त्रिपाठी, गिर्यारोहक आशिष माने यांना ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार’, सीए मोहित धांड, गायिका प्रीती दवे व पिंकी दवे, जलतरणपटू हातवी शहा यांना ‘सूर्यदत्त नॅशनल यंग अचिव्हर अवॉर्ड’, तर मास्टर ऋषी शिव प्रसन्न आणि मास्टर राघव मालपाणी यांना ‘सूर्यदत्त लिट्ल मास्टर नॅशनल अवॉर्ड’ देण्यात आला.
उदय लळीत म्हणाले, “यशस्वी होऊ की नाही, हा प्रश्न प्रत्येक तरुणाच्या मनात असतो. मात्र स्वतःवरचा विश्वास, सातत्यपूर्ण मेहनत आणि कामातील उत्कृष्टता यामुळेच यशाचे टप्पे गाठता येतात. माझा महाराष्ट्राच्या मातीशी जवळचा संबंध आहे.
माझी कर्मभूमी दिल्ली आणि सर्वोच्च न्यायालय आहे. वकिली केल्यानंतर मला सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश म्हणून काम करण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य आहे. भारताची लोकसंख्या तरुण असून ३५ वर्षांखालील नागरिकांचे प्रमाण लक्षणीय आहे. हे मनुष्यबळ सक्षमपणे घडवणे हे राष्ट्रनिर्मितीतील मोठे कार्य आहे.
स्वातंत्र्यानंतर साक्षरतेपासून ते विद्यापीठांच्या वाढीपर्यंत झालेली प्रगती अधोरेखित करत, गुणवत्तापूर्ण मानके निर्माण करण्याचे महत्त्व ओळखून सूर्यदत्त फाउंडेशन अत्यंत प्रभावीपणे करत असल्याबद्दल चोरडिया दाम्पत्यांचे विशेष कौतुक करतो.”
अशोक सराफ म्हणाले, “वेगवेगळ्या क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या व्यक्तींना समोर आणून सन्मानित करण्याचा चोरडिया दाम्पत्याचा हा उपक्रम समाजाला प्रेरणादायी आहे. माझ्या प्रवासात निवेदिताची मोलाची साथ लाभली.
चांगले झाले तर कौतुक आणि काही चुकले तर स्पष्टपणे सांगणाऱ्या निवेदिता आणि माझ्या सहवासाची ३७ वर्षे झाली. सभागृहात उपस्थित प्रत्येकाची साथ मला लाभली. तुम्हा प्रेक्षकांच्या पावतीमुळेच काम करताना हुरूप येतो आणि आणखी जोमाने काम करता येते.”
एअरमार्शल भूषण गोखले म्हणाले, “आपण कितीही यशाची शिखरे गाठली, तरी मातीशी नाळ जोडून ठेवायला हवी. शिक्षणसंस्था चालवण्यासह सामाजिक कार्यातही सक्रिय राहून सूर्यदत्त परिवाराने आदर्श निर्माण केला आहे.
मूल्याधिष्ठित, समाजहिताचे शिक्षण नव्या पिढीला घडवण्यासाठी उपयुक्त आहे.” प्रा. शरदचंद्र दराडे यांनी सूर्यदत्त संस्थेच्या प्रगतीचे कौतुक करीत आपल्या विद्यार्थ्याने केलेल्या या कार्याचा आनंद वाटतो, असे नमूद केले. सर्व पुरस्कारार्थींनी सत्काराला उत्तर दिले. श्वेता राठोड व संदीप पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सुषमा चोरडिया यांनी आभार मानले.
सूर्यदत्त शिक्षण संस्थेच्या स्थापनेपासूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि मूल्याधिष्ठित शिक्षणावर भर दिला आहे. चांगला भारतीय नागरिक घडवण्यासाठी समाजातील आदर्श व्यक्तिमत्त्वांना विद्यार्थ्यांसमोर आणले जाते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त पुरस्काराने सन्मानित केले जाते. – प्रा. डॉ. संजय चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन




















