आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

वाघोलीचे भारतीय जैन संघटना विद्यालय गुणवत्तेत जिल्ह्यात प्रथम

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW - Social News, MJW Daily News(Post Slider), News, News Slider, Social • April 26, 2025
Spread the love

पुणे : पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या गुणवत्ता संवर्धन अभियानात वाघोली येथील भारतीय जैन संघटना विद्यालयाने पुणे जिल्ह्यातील १५०० शाळांमध्ये अव्वल क्रमांक मिळवत गौरव प्राप्त केला आहे.

१००० हून अधिक विद्यार्थ्यांची संख्या असलेल्या शाळांच्या गटात बीजेएस विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला. या अभियानाअंतर्गत शाळेच्या भौतिक सुविधा, प्रशासन, अध्यापन प्रक्रिया व गुणवत्ता वाढीसाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांचे मूल्यांकन विशेष पथकाद्वारे करण्यात आले. त्यानुसार बीजेएस विद्यालय विजेता ठरले.

२४ एप्रिल रोजी गणेश कला क्रीडा मंच, पुणे येथे पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. यावेळी पुणे शहर विभागातून बीजेएस विद्यालयास प्रथम क्रमांकाने गौरवण्यात आले. कार्यक्रमात शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर, उपशिक्षणाधिकारी छाया महेंद्रकर, संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर, शहर अध्यक्ष शिवाजी शिंदे, सचिव किशोर बोरसे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.

प्राचार्य संतोष भंडारी, पर्यवेक्षक पांडुरंग पवार, उपप्राचार्य पोपटराव गेठे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दोन्ही स्तरावरील (जिल्हा व तालुका) पुरस्कार स्वीकारले. या यशाबद्दल संस्थापक शांतीलाल मुथ्था, प्रबंध समितीचे अध्यक्ष विलास राठोड, शाळा समितीचे अध्यक्ष अरुण नाहर व प्रकल्प व्यवस्थापक सुरेश साळुंके यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आणि आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्राचार्य संतोष भंडारी यांनी यशामागे संपूर्ण शिक्षकवर्गाचे संघटन आणि गुणवत्ता वाढीसाठी सातत्याने केलेले प्रयत्न कारणीभूत असल्याचे सांगितले. या अभियानामुळे इतर शाळांतील नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती मिळाली असून, भविष्यात अशा उपक्रमांची अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सहा विभागांतील प्रमुख म्हणून राजेंद्र जायभाय, पूनम सिंह, वंदना बोडके, विष्णू देवडकर, संदीप लोणकर, रेश्मा शितोळे, स्मिता शिंदे, मारुती बोडके, विकास लोणकर व कीर्ती ढमाले यांनी विशेष योगदान दिले.