महाराष्ट्र न्युज नेटवर्क
भूम : भारतीय सैन्याने यशस्वीरित्या राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भूम शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीद्वारे शूर सैनिकांचे अभिनंदन करण्यात आले तसेच ऑपरेशन दरम्यान शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थित नागरिकांनी पाकिस्तानविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
गुरुवार, दिनांक २२ मे २०२५ रोजी शहरातील सजग नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत रॅली काढली. या रॅलीत विंग कमांडर व्योमिका सिंह व कर्नल सोफिया कुरेशी या धाडसी महिला अधिकाऱ्यांच्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले.
रॅलीदरम्यान पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरदरम्यान शहीद झालेल्या भारतीय नागरिक व सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. “भारत माता की जय”, “वंदे मातरम”, “जय जवान जय किसान” या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
या तिरंगा रॅलीत माजी नगराध्यक्ष विजयसिंह थोरात, बाळासाहेब क्षीरसागर, संतोष सुपेकर, महादेव वडेकर, बाबासाहेब वीर, विलास शाळू, आबासाहेब मस्कार, अँड. संजय शाळु, चंद्रकांत गवळी, शंकरराव खामकर, माजी सैनिक हेमंत देशमुख, अनिल शेंडगे, सुब्राव शिंदे, प्रदीप साठे, मुकुंद वाघमारे यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध शाळा, महाविद्यालये, अकॅडमी आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
रॅली भूम नगरपालिकेपासून सुरू होऊन गांधी चौक, बागवान गल्ली, बाजार रोड, लक्ष्मी रोड मार्गे गोलाई चौक येथे पोहोचली. समारोप प्रसंगी माजी सैनिकांना गुलाब पुष्प देऊन राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. तसेच अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करत पाकिस्तानविरोधात रोष व्यक्त केला.
