आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

झोमॅटो डिलिव्हरी बॉयला बांबुने मारहाण करुन केले जखमी

Spread the love

पुणे : ऑनलाईन जेवण पोहोचविताना उशीर झाल्याच्या कारणावरून झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला चौघांनी लाकडी बांबू व हाताने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना आंबेगाव परिसरात घडली आहे.

याप्रकरणी जुबेर अहमद रशिद शेख (वय ३५, रा. धायरी फाटा) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार विकास काशिनाथ धोत्रे (वय २१, रा. साईनगर, कात्रज) व त्याच्या तीन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना आंबेगाव येथील वाघजाईनगरमधील रंगाशेठ चौकात ४ फेब्रुवारी रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जुबेर शेख हे झोमॅटोमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात. आरोपी विकास धोत्रे व त्याच्या साथीदारांनी रात्री ११ वाजता जेवणाची ऑर्डर दिली होती. सदर ऑर्डर पोहचविण्यासाठी जुबेर शेख वाघजाईनगरकडे जात असताना त्यांच्या दुचाकीतील पेट्रोल संपले. त्यामुळे त्यांनी गाडी बाजूला लावून पायी चालत जाऊन रात्री साडेअकरा वाजता जेवणाची डिलिव्हरी केली.

डिलिव्हरीस उशीर का झाला, यावरून आरोपी व फिर्यादी यांच्यात वाद झाला. पेट्रोल संपल्यामुळे उशीर झाल्याचे कारण सांगत असतानाच आरोपींनी जुबेर शेख यांना हाताने तसेच लाकडी बांबूने हात, पाय आणि डोक्यावर मारहाण करून जखमी केले. परिसरात लोकांची गर्दी जमू लागल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले.

दरम्यान, पोलिसांची गस्ती व्हॅन घटनास्थळी पोहोचली. जखमी अवस्थेत असलेल्या जुबेर शेख यांना आंबेगाव पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात आले. आंबेगाव पोलिसांनी चौघांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार लोहार पुढील तपास करीत आहेत.