विक्रांत मंडलेचा अध्यक्ष तर सचिव पदी प्रीतम लुंकड यांची निवड
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : करमाळा भुसार व्यापारी असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीत नव्या पदाधिकाऱ्यांची निवड एकमताने करण्यात आली. या निवडीत विक्रांत मंडलेचा यांची अध्यक्षपदी, मयूर दोशी यांची उपाध्यक्षपदी, प्रीतम लुंकड यांची सचिवपदी तसेच उत्कर्ष गांधी यांची सहसचिवपदी निवड करण्यात आली.
ही निवड अत्यंत खेळीमेळीच्या आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली. या प्रसंगी मावळते अध्यक्ष विजयकुमार दोशी, उपाध्यक्ष अनिलकुमार सोळंकी, सचिव मिलिंद दोशी यांच्यासह अनेक व्यापारी बांधव उपस्थित होते. नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीनंतर करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमास बाजार समितीचे सभापती तथा माजी आमदार जयवंतराव जगताप प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ व शाल–श्रीफळ देऊन सत्कार केला आणि त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
माजी आमदार जगताप यांनी व्यापारी वर्गाच्या भूमिकेचे कौतुक करताना सांगितले की, “करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचा नावलौकिक टिकवून ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणे गरजेचे आहे.
शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळवून देणे हीच खरी व्यापाऱ्यांची सेवा आहे.” तसेच नव्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शेतकरीहिताचे काम अधिक व्यापक पातळीवर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला अर्बन बँकेचे चेअरमन कन्हैयालाल देवी, माजी नगराध्यक्ष अमोद संचेती, बाजार समितीचे संचालक परेशकुमार दोशी, मनोज पितळे, बाळासाहेब पवार, माजी संचालक संतोष वादे, सुनील मेहता, कृषी अधिकारी देवटाव चव्हाण, तसेच व्यापारी राजेंद्र चिवटे, गोरख ढेरे, कालिदास लोंढे, विलास जाधव, विपुल शहा, पप्पू कटारिया, शितिप व्होटा, गिरीश दोशी, आशिष बोटा, जयताज चिवटे, प्रवीण कुटे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी केले, तर आभार सचिव विठ्ठल क्षिरसागर यांनी मानले. नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीनंतर व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, अध्यक्ष विक्रांत मंडलेचा, सचिव प्रीतम लुंकड आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली असोसिएशन नव्या जोमाने आणि कार्यक्षमतेने कार्यरत राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
