दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाची कामगिरी : १६ लाखांचा ऐवज हस्तगत
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : कात्रज-कोंढवा रोडवरील गोकुळनगर येथील एका घराचा कडी-कोयंडा उचकटून चोरट्याने घरातील २४ लाख ४८ हजार ७५० रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. चोरी नेमकी कधी झाली, हे समजले नव्हते. दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने मागील चार दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. आरोपीला पकडल्यानंतर तो फिर्यादींच्या ओळखीचा असल्याचे निष्पन्न झाले.
कुमार रामचंद्र ठाकर (वय ३८, रा. अशोक अपार्टमेंट, दत्तनगर, आंबेगाव) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या दोन साथीदारांचा शोध सुरू आहे. याबाबत जिजाप्पा आजिनाथ देवकाते (वय ६५, रा. गल्ली नं. ३, विठ्ठल मंदिराजवळ, कात्रज-कोंढवा रोड, गोकुळनगर) यांनी येवलेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यांच्या घराचा कडी-कोयंडा उचकटून चोरट्याने आत प्रवेश केला. बेडरूममधील कपाटाचे दार व आतील ड्रॉवर उचकटून कपाटातील सोन्याचे दागिने, चांदी व रोख रक्कम असा २४ लाख ४८ हजार ७५० रुपयांचा ऐवज चोरून नेला. चोरीचा हा प्रकार २ ते ६ फेब्रुवारी २०२६ दरम्यान घडला होता.
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने या चार दिवसांतील सीसीटीव्ही फुटेज तपासून तिघा संशयितांची ओळख पटवली. त्यापैकी कुमार ठाकर याची ओळख निश्चित झाली. पोलीस अंमलदार परेश सावंत व विनायक येवले यांना बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी शोध घेतला.
कात्रज येथील पीएमपी बस डेपो परिसरातून कुमार ठाकर याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एकूण ११५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ८०० मिलीग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व ३५ हजार रुपये रोख असा १६ लाख ६५ हजार ७०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
कुमार ठाकर याला शेअर मार्केटमध्ये नुकसान झाले होते. त्याच्यावर कर्ज झाले होते. जिजाप्पा देवकाते यांच्या घरी सोने व रोकड असल्याची माहिती त्याला होती. त्यातूनच त्याने दोघा साथीदारांच्या मदतीने घरफोडी केल्याचे सांगितले.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्ताराम बागवे, सहायक पोलीस निरीक्षक सी. बी. बेरड, पोलीस उपनिरीक्षक एस. जे. तानवडे, तसेच पोलीस अंमलदार कैलास चव्हाण, राजू पुणेकर, परेश सावंत, प्रफुल्ल मोरे, विनायक येवले व विक्रांत सासवडकर यांनी केली.















