लोणी काळभोर पोलिसांची कामगिरी : कदमवाक वस्तीतील घटना, ८ तासांत चोरटे अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : मॉर्निंग वॉकला गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाला शिवीगाळ करून दुखापत करत जबरदस्तीने त्यांचा मोबाईल चोरून नेणाऱ्या चौघांना लोणी काळभोर पोलिसांनी अवघ्या ८ तासांत जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.
सुजल बाळासाहेब झेंडे (वय २०, रा. गुरुदत्त कॉलनी, भेकराईनगर, हडपसर), शुभम संजय चव्हाण (वय २४, रा. गोसावी वस्ती, हडपसर), ओमकार अशोक चिंतलू (वय २१, रा. आनंदनगर सोसायटी, हडपसर) आणि अभिजित सतीश कांबळे (वय २०, रा. कदमवाक वस्ती) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
फिर्यादी व त्यांचे मित्र ८ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात वाजता कदमवाक वस्तीतील रिव्हर व्ह्यू सिटीच्या मागील रेल्वे लाईनजवळील मोकळ्या जागेत फिरायला गेले होते. त्यावेळी चौघांनी फिर्यादींना शिवीगाळ करून दुखापत केली आणि त्यांच्याकडील मोबाईल जबरदस्तीने चोरून नेला.
या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पथकाला बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी अवघ्या ८ तासांत चौघांना अटक केली. त्यांच्याकडून चोरलेला मोबाईल तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेल्या दोन मोटारसायकली असा एकूण १ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव तसेच पोलीस अंमलदार सागर जगदाळे, रामहरी वणवे, संभाजी देवीकर, अण्णा माने, बाजीराव वीर, प्रवीण दडस, सूरज कुंभार, प्रशांत सुतार, सचिन सोनवणे, राहुल कडिरले व अशोक गिरी यांनी केली.















