दोघांनी डोक्यात दगडी फरशी घालून केला खुनाचा प्रयत्न, गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : खुनाच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीवर दोघा सहआरोपींनी दगडी फरशीने हल्ला करत त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना घडली आहे. या हल्ल्यात आरोपी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विशाल नागनाथ कांबळे (वय २८, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे गंभीर जखमी झालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी कारागृहातील अधिकारी सचिन गोविंदराव गुरव यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यावरून आकाश सतीश चंडालिया (वय ३०, रा. जय जवाननगर, लक्ष्मीनगर, येरवडा) आणि दीपक संजय रेड्डी (वय २७, रा. इंद्रायणी कॉलनी, कामशेत) यांच्याविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना १५ डिसेंबर रोजी सकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास येरवडा कारागृहातील बॅरेक क्रमांक १ मध्ये घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश चंडालिया, दीपक रेड्डी आणि विशाल कांबळे हे तिघेही खुनाच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असून त्यांना एकाच बॅरेकमध्ये ठेवण्यात आले होते. ते एकत्र गप्पागोष्टी करीत असत आणि एकमेकांची चेष्टामस्करीही चालू होती. याच कारणातून त्यांच्यात वारंवार वाद होत होते.
१५ डिसेंबर रोजी सकाळी सर्वांनी लवकर उठून दैनंदिन कामकाज उरकले. त्यानंतर विशाल कांबळे हा पुन्हा झोपला असताना, दरवाज्याजवळ झोपलेल्या विशालच्या डोक्यावर व कमरेवर आकाश चंडालिया आणि दीपक रेड्डी यांनी दगडी फरशीने एकापाठोपाठ एक घाव घातले. या हल्ल्यामुळे विशाल गंभीर जखमी झाला.
प्रकार घडताच इतर कैद्यांनी आरडाओरडा केला. त्यानंतर कारागृहातील रक्षक व अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही आरोपींना वेगळे करत जखमी विशाल कांबळे याला त्वरित ससून रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याची प्रकृती गंभीर असून उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनावणे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक जर्हाड करीत आहेत.
गंभीर गुन्ह्यातील आरोपी
विशाल कांबळे हा संदीप सुभाष देवकर (वय ४९, रा. नवी खडकी, येरवडा) यांच्या खुनाच्या आरोपाखाली येरवडा कारागृहात आहे. हातगाडी लावण्याच्या वादातून ५ जानेवारी २०१९ रोजी विशाल कांबळे व त्याच्या साथीदारांनी रिव्हॉल्व्हरने गोळीबार करत तसेच धारदार हत्याराने वार करून संदीप देवकर यांचा खून केला होता. तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत असून त्याला अद्याप जामीन मिळालेला नाही. आकाश चंडालिया याने आपल्या साथीदारांसह विकी चंडालिया याच्यावर अग्रेसन स्कूलसमोर गोळीबार करत खुनाचा प्रयत्न केला होता. ही घटना १९ एप्रिल २०२४ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती. त्या प्रकरणातही आकाश चंडालिया तेव्हापासून येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.
















