मंडळ अधिकाऱ्यांचा पगार काढण्यासाठी मागितली होती ६० हजारांची लाच : ४० हजार घेताना अडकले
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : तलाठी म्हणून काम करत असताना त्यांना एप्रिल २०२५ मध्ये मंडळ अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली. मात्र, तेव्हापासून त्यांचा पगार काढला जात नव्हता. हा पगार काढण्यासाठी ६० हजार रुपयांची लाच मागून ४० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नायब तहसीलदाराला सापळा रचून रंगेहाथ पकडले.
चंद्रकांत काशिनाथ हेडगिरे (वय ५२, रा. शिवरत्ननगर, जुळे सोलापूर) असे अटक केलेल्या नायब तहसीलदाराचे नाव असून ते उत्तर सोलापूर तहसील कार्यालयात कार्यरत आहेत. तक्रारदार हे उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाच्या हद्दीत मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
त्यांची एप्रिल २०२५ मध्ये तलाठी ते मंडळ अधिकारी अशी पदोन्नती झाली असून उत्तर सोलापूरमधील सोरेगाव मंडळ येथे त्यांची नियुक्ती झाली आहे. पदोन्नती मिळूनही एप्रिल २०२५ पासून त्यांना पगार मिळालेला नव्हता. त्यांनी उत्तर सोलापूरचे तहसीलदार यांच्याकडे विनंती केली; मात्र त्यांनी ही बाब गांभीर्याने न घेता जबाबदारी टाळली.
त्यानंतर तक्रारदार निवासी नायब तहसीलदार चंद्रकांत हेडगिरे यांना भेटले. हेडगिरे यांनी तक्रारदारांना लवकरात लवकर पगार पत्रक तयार करून साहेबांना सांगून पगार करून देतो, त्यासाठी ४० हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगून लाचेची मागणी केली.
त्यानुसार तक्रारदारांनी ५ डिसेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची १५ डिसेंबर रोजी पडताळणी करण्यात आली. पडताळणीदरम्यान निवासी नायब तहसीलदार हेडगिरे यांनी ८ महिन्यांचा थकीत पगार मिळवण्यासाठीची प्रक्रिया राबवून बील पुढे पाठविले असल्याचे सांगून ६० हजार रुपयांची लाच मागितली व तडजोडीनंतर ४० हजार रुपयांवर लाच निश्चित केली.
यानंतर तक्रारदार उत्तर सोलापूरच्या तहसीलदारांकडे गेले. त्यांनी पगार काढण्याबाबत विनंती केली असता तहसीलदार म्हणाले, “मंडळ अधिकारी यांना पगार कशाला लागतो?” मात्र, त्यांनी लाचेबाबत काही न सांगितल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उत्तर सोलापूर तहसील कार्यालयात सापळा लावला.
तक्रारदाराकडून ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना नायब तहसीलदार चंद्रकांत हेडगिरे याला सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्याविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील व अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. पोलीस निरीक्षक शैलेश पवार अधिक तपास करीत आहेत.
















