नागरिकांमध्ये घबराट : वन विभागाच्या रेस्क्यू टीमला पाचारण
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरातील उपनगरांमधील अनेक ठिकाणी बिबटे आढळून येत असल्याचे सांगितले जात आहे. विमानतळावरील बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आले असतानाच, गुरुवारी पहाटे मुंढव्यातील केशवनगर भागातील एका सोसायटीच्या सीसीटीव्हीमध्ये बिबट्या आढळून आला. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
मुंढव्यातील केशवनगर येथील अल्कॉन सिल्व्हर लिफ सोसायटीच्या आवारात सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. सोसायटीच्या आवारातील मोकळ्या जागेत गुरुवारी पहाटे ४ वाजून १० मिनिटांनी बिबट्या दबक्या पावलाने येताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाला.
सकाळी नागरिकांनी सीसीटीव्ही पाहिल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. तो एका गेटमधून आत आला. सोसायटीत काही क्षण थांबल्यानंतर तो दुसऱ्या गेटने पळून गेला. तो नेमका कुठे गेला, हे समजू शकले नाही.
नागरिकांनी याची माहिती वन विभाग व पोलिसांना दिली. मुंढवा पोलिसांनी वन विभागाच्या रेस्क्यू टीमला पाचारण केले आहे. ही टीम केशवनगर परिसरात पोहोचली असून बिबट्या नेमका कुठे गेला, तसेच त्याच्या पावलांचे ठसे आढळतात का, याची माहिती घेत आहे.















