‘वंदे मातरम्’ राष्ट्रीय समितीचे प्रतीक: प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : ‘वंदे मातरम्’ हे केवळ दोन शब्द नसून, आपल्या राष्ट्रीय अस्मितेचे आणि स्वातंत्र्यलढ्याच्या प्रेरणेचे प्रतीक आहे. या गीताच्या १५० वर्षांच्या गौरवशाली परंपरेचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे, असे मत सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी व्यक्त केले. तर जीवनात मानसिक स्वास्थ्य, आत्मचिंतन आणि सकारात्मक दृष्टिकोन जोपासण्यावर भर द्यावा, असे प्रतिपादन राजयोग आत्मचिंतन गुरु बीके मंगल दीदी यांनी केले.
सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन तसेच भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा प्राण असलेल्या ‘वंदे मातरम्’ या गीताचे १५० वे वर्ष अत्यंत आदराने व उत्साहात साजरे करण्यात आले. प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते कृष्णन सुब्रमणी, बावधन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भास्कर कदम, राजयोग आत्मचिंतन गुरु बीके मंगल दीदी, ‘सूर्यदत्त’च्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, अधिष्ठाता प्रा. डॉ. प्रतीक्षा वाबळे, मुख्य कार्यपालन अधिकारी अक्षित कुशल यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कृष्णन सुब्रमणी यांनी शिक्षणासोबतच सजग नागरिकत्व महत्त्वाचे असून, प्रत्येकाने आपली सामाजिक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, असे सांगितले. बीके मंगल दीदी यांनी मन:शांती व बौद्धिक संतुलन राखल्यासच व्यक्ती खऱ्या अर्थाने प्रगती करू शकते, असे मत व्यक्त करत शांत मन आणि स्वच्छ विचार जपण्याचा सल्ला दिला.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी ‘वंदे मातरम्’च्या ऐतिहासिक महत्त्वावर प्रकाश टाकत, स्वातंत्र्यलढ्यात देशाला एकत्र बांधण्याचे कार्य या गीताने केले असल्याचे सांगितले. आजच्या पिढीने या गीतातून मिळणारी राष्ट्रभक्तीची प्रेरणा आत्मसात करावी, असे आवाहन त्यांनी केले. तर देशाची एकता, शांतता आणि सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहावे, असे मत पोलीस निरीक्षक भास्कर कदम यांनी व्यक्त केले.
‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसमध्ये मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रध्वजाला वंदन करून राष्ट्रगीत गायले गेले. यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर नृत्य, गीते आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली. ‘वंदे मातरम्’च्या १५० व्या वर्षपूर्तीच्या औचित्याने सादर करण्यात आलेल्या कार्यक्रमाला विशेष दाद मिळाली.
या कार्यक्रमाचे संयोजन डॉ. सारिका झांबड आणि प्रा. केतकी बापट यांनी केले. सूत्रसंचालन फार्मसी विभागातील आदित्य कांबळे व समीक्षा चोरडिया तसेच विधी विभागातील आख्या उपमन्यू व श्रुती वैद यांनी केले.
नृत्य व योगशास्त्र शिक्षिका सोनाली ससार यांनी बसवलेला बहारदार नृत्याविष्कार आणि योग शिक्षिका मीनल गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सादर केलेली योगासनांची प्रात्यक्षिके यांतून भारतीय संस्कृती आणि राष्ट्रभक्तीचा सुंदर संगम पाहायला मिळाला.
विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांतून सादर केलेली प्रेरणादायी भाषणे तसेच ‘ऐ वतन’ या गीताच्या हृदयस्पर्शी सादरीकरणाने उपस्थितांचे डोळे पाणावले. राष्ट्रप्रेमाचा हा ओसंडून वाहणारा उत्साह आणि विद्यार्थ्यांची समर्पित भावना पाहून संपूर्ण वातावरण भारावून गेले होते.















