खेळाडूंच्या शुभहस्ते ध्वजारोहण : देशभक्तीमय वातावरणात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : दत्तनगर येथील आनंद दरबार, कात्रज (पुणे) येथे सोमवार, दि. २६ जानेवारी रोजी भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात, शिस्तबद्ध व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी ठीक ८ वाजता ढोल-ताशांच्या गजरात ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला.
यावर्षीचे ध्वजारोहण किंग बॉक्सिंग गोल्ड मेडलिस्ट वेदांत सोनार, तिरंदाजी गोल्ड मेडलिस्ट टिशा संचेती आणि ॲबकस गोल्ड मेडलिस्ट विनय लूणावत यांच्या शुभहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
ध्वजारोहणानंतर उपस्थित सर्वांनी राष्ट्रगीतास मानवंदना दिली. त्यानंतर श्री चक्रधर स्वामी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूहगीत, प्रेरणादायी भाषणे तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय संविधानाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमस्थळी नूतन कुलकर्णी व सविता बाबर यांनी साकारलेल्या आकर्षक रांगोळ्या, विद्यार्थ्यांचे लेझीम सादरीकरण तसेच ढोल-ताशांच्या गजरामुळे संपूर्ण आनंद दरबार परिसर देशभक्तीमय वातावरणाने भारावून गेला.
लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक नानासाहेब बेलदरे, जनहित विकास मंचचे अध्यक्ष सुधीर कोंढरे, शिवशंभू प्रतिष्ठान जांभुळवाडीचे अध्यक्ष नितीन जांभळे, शिवांजली मित्र मंडळाचे अध्यक्ष अंकुश जाधव, सामाजिक कार्यकर्ते राजू फरांदे तसेच श्री चक्रधर स्वामी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महेंद्र कोंढरे, घोलप सर व ठोकळे सर आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांनी आपल्या मनोगतातून संविधान, लोकशाही मूल्ये, राष्ट्रीय एकात्मता आणि युवकांनी देशउभारणीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक आनंद दरबारचे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांनी केले.
आनंद दरबारच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम सातत्याने राबविले जात असून, अशा उपक्रमांमुळे नव्या पिढीत देशभक्तीची भावना अधिक दृढ होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
उपस्थित मान्यवरांची ओळख अंकिता धोका यांनी करून दिली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आनंद दरबार दत्तनगरचे सर्व ट्रस्टी, सदस्य व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी परिसरातील नागरिक, पालकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध, उत्साही आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.















