आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

गंगाधाम रोडवरील बंद कंपनीतून क्लोरीन वायूची गळती

Spread the love

पुणे : मार्केटयार्ड येथील गंगाधाम-बिबवेवाडी रस्त्यावरील एका बंद रासायनिक कंपनीच्या गोदामात ठेवलेल्या क्लोरीन वायूची गळती झाल्याने परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर श्वसनाचा त्रास झाला. खालचा कोंढवा परिसरातील सुमारे ५० नागरिकांना त्रास झाला, तर अंबामाता मंदिर परिसरातील २४ नागरिकांवर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. अग्निशमन दलाचे अधिकारी सुनील नाईकनवरे आणि एका जवानालाही त्रास झाल्याने त्यांच्यावरही ससून रुग्णालयात उपचार करण्यात आले.

अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जलतरण तलावातील पाण्याची साफसफाई करण्यासाठी या कंपनीने पत्र्याचे गोदाम उभारले होते. त्यात क्लोरीन वायूसह इतर गॅसच्या टाक्या ठेवण्यात आल्या होत्या.

कंपनीचे कंत्राट संपल्याने त्या गॅसच्या टाक्या तशाच गोदामात पडून होत्या. गोदामात अनेक टाक्या ठेवण्यात आल्या होत्या. त्यामधील क्लोरीन वायूच्या टाकीतून रात्री उशिरा गळती सुरू झाली.

परिसरात हा वायू वेगाने पसरू लागला. नागरिकांना डोळे चुरचुरणे आणि श्वसनाचा त्रास जाणवू लागला. रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी अग्निशमन दलाला याची माहिती मिळाली.

अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरक्षाविषयक उपकरणे (बी.ए. सेट) परिधान करून कंपनीत प्रवेश केला. त्यांनी गळती होत असलेली टाकी गोदामातून बाहेर काढून मोकळ्या जागेत आणली व गळती थांबवली.

या वायुगळतीमुळे अंबामाता मंदिर परिसरातील अनेक नागरिकांना, विशेषतः अल्पवयीन मुले व ज्येष्ठ नागरिकांना श्वसनाचा त्रास झाला.

त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती सध्या स्थिर आहे. अग्निशमन दलाचे अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ५ अधिकारी व ३० जवान मदतकार्यात सहभागी झाले होते.