आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

तरुणीच्या गळा चिरून जीवे मारण्याचा प्रयत्न

Spread the love

पुणे : प्रेमप्रकरणातून झालेल्या वादातून प्रियकराने घरात शिरून ब्लेडने तरुणीचा गळा चिरून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. तरुणीवर खासगी रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.

उजालादेवी जसवंतसिंग दोहरे (वय २२, सध्या रा. दिनकर पठारे वस्ती, चंदननगर, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणीचे नाव आहे.

याबाबत उजालादेवीचा मोठा भाऊ भगतसिंग दोहरे (वय २५) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी दिलीप राठोड (रा. चंदननगर, मूळ रा. हिंगोली) याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उजालादेवी आणि आरोपी दिलीप राठोड हे अहिल्यानगर रस्त्यावरील एका मॉलमध्ये काम करत होते. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते.

दिलीप राठोडने मॉलमधील नोकरी सोडली होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होता. उजालादेवी ही चंदननगरमधील पठारे वस्ती भागात राहते.

बुधवारी, २९ एप्रिल रोजी रात्री दहा वाजता राठोड पठारे वस्ती भागात आला. त्या वेळी तरुणी एकटीच घरात होती. तिचा भाऊ भगतसिंग आणि त्याची पत्नी कामावर गेले होते.

राठोड उजालादेवी यांच्या घरात शिरला. त्याला घरात पाहताच उजालादेवी आणि राठोड यांच्यात वाद झाला. त्याने ब्लेडने तिचा गळा चिरला. राठोडने केलेल्या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली.

जखमी अवस्थेत तिने भाऊ भगतसिंग याच्या मोबाईलवर संपर्क साधला. “तू लवकर घरी ये, मला एकाने मारले आहे,” असे तिने भावाला सांगितले.

त्यानंतर भावाने तेथे धाव घेतली. त्याने तिला ससून रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती गंभीर असल्याचे पाहून तिला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.

पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, हिमंत जाधव, सहायक पोलीस आयुक्त नूतन पवार, शंकर खटके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश बडाख, गोविंद जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. पोलीस निरीक्षक अमोल धस तपास करत आहेत.