आरटीई अंतर्गत प्रवेश देण्यासाठी लाच घेणारा एजंट गजाआड
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : गरीब मुलांना चांगल्या शाळेत शिकता यावे यासाठी राज्य सरकारने शिक्षण हक्क कायदा केला. त्यामुळे एरवी त्या शाळेची फी परवडली नसती अशा शाळांमध्ये असंख्य गरीब मुले शिकू लागली. मात्र त्यांच्या शिक्षण हक्कामध्ये आता ‘झारीतील शुक्राचार्य’ निर्माण झाले आहेत, हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) मुलीचा प्रवेश करून पडताळणी फॉर्मची पावती देण्यासाठी ४० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून एका एजंटला अटक केली आहे.
ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली गंगाराम जगताप (वय ३७, रा. नंदनवन कॉलनी, चिंचवडे नगर, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत एका मुलीच्या वडिलांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारदारांनी आपल्या मुलीच्या आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी १६ मार्च २०२६ रोजी ऑनलाइन अर्ज भरला होता.
या अर्जाची पडताळणी करण्यासाठी ते २७ एप्रिल २०२६ रोजी आकुर्डी येथील फकीरभाई पानसरे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका उर्दू प्राथमिक शाळेत गेले होते. तेथे त्यांना अर्ज फेटाळल्याचे सांगण्यात आले.
त्यावेळी त्यांची भेट माऊली जगताप याच्याशी झाली. त्याने तक्रारदारांच्या मुलीचा प्रवेश करून पडताळणी अर्जाची पावती देण्यासाठी ४० हजार रुपये द्यावे लागतील, अशी लाचेची मागणी केली.
याबाबतची तक्रार २९ एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त झाली. त्याची पडताळणी ३० एप्रिल रोजी करण्यात आली.
त्यामध्ये माऊली जगताप याने मुलीच्या अॅडमिशनसाठी ४० हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर फकीरभाई पानसरे उर्दू शाळेत सापळा रचण्यात आला. तक्रारदारांकडून ४० हजार रुपये स्वीकारताना माऊली जगताप याला रंगेहात पकडण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश घरबुडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. पोलीस निरीक्षक आसावरी शेडगे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
