आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

सहा ड्रग्ज तस्करांकडून ४२ लाखांची एमडी पावडर जप्त

Spread the love

पुणे : ‘पुणे फ्री ड्रग्ज’ या विशेष मोहिमेत अंमली पदार्थांच्या तस्करांवर कारवाई करण्यात आली. लोणीकंद पोलिसांनी चार वेगवेगळ्या कारवायांमध्ये एमडी पावडरची तस्करी करणाऱ्या सहा जणांना पकडून त्यांच्याकडून ४१ लाख ९६ हजार रुपयांची १७५ ग्रॅम मॅफेड्रॉन ड्रग्ज जप्त केली आहे.

पुंजाजी जयचंद्र चौधरी (वय ४०, रा. जय मल्हार सोसायटी, वाघोली, मूळ रा. निपाणा, ता. मोताळा, जि. बुलढाणा), राजेंद्र केरू टेळे (वय ३५, रा. अथर्वनगर, चाकण रोड, शिक्रापूर), करण सचिन मोहिते (वय २१, रा. सणसवाडी), भगीरथसिंग सज्जनसिंग राजपुरोहित (वय २८, रा. मांजरी, मूळ रा. राजस्थान), आदिनाथ दशरथ शिर्के (वय २९, रा. मांजरी), योगेश लक्ष्मण चव्हाण (वय ३७, रा. आझाद गल्ली, शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पुणे शहरातून अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्याच्या सूचना वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिता रोकडे यांनी दिल्या होत्या.

पोलीस अंमलदार कैलास साळुंके व स्वप्निल जाधव यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की, लोणीकंदमधील कटकेवाडी येथे एक तस्कर येणार आहे.

त्यानुसार पोलिसांनी पुंजाजी चौधरी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४ लाख ३७ हजार २०० रुपयांचे २१ ग्रॅम एमडी ड्रग्ज पावडर, मोबाईल असा एकूण ४ लाख ८७ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

पेरणे फाटा येथे २० एप्रिल रोजी राजेंद्र टेळे व करण मोहिते यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ११ लाख ८३ हजार रुपयांची ५९ ग्रॅम एमडी पावडर, कार, मोबाईल, रोख रक्कम असा एकूण १४ लाख १० हजार ९७० रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

भगीरथसिंग सज्जनसिंग राजपुरोहित याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून ४ लाख २८ हजार ६०० रुपयांचे २१ ग्रॅम एमडी पावडर, ४ लाखांची कार, मोबाईल, रोख रक्कम असा एकूण ८ लाख ३४ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

या तिघांना अटक करून एकत्रित तपास केल्यानंतर त्यातून योगेश चव्हाण याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून १४ लाख ५० हजार रुपयांची ७२ ग्रॅम मॅफेड्रॉन ड्रग्ज पावडर जप्त करण्यात आली.

या कारवाईत सहा आरोपींना अटक करून एकूण ४१ लाख ९६ हजार रुपयांची १७५ ग्रॅम एमडी पावडर जप्त करण्यात आली आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक पोलीस आयुक्त नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिता रोकडे, पोलीस उपनिरीक्षक अर्जुन बेदगुडे, तुकाराम सुरवसे, पोलीस अंमलदार स्वप्निल जाधव, कैलास साळुंके, सागर जगताप, गणेश गायकवाड, संतोष अंदुरे, मल्हारी सपुरे, शुभम चिनके, सुधीर शिवले, दिनेश मरकड, शंकर क्षीरसागर, संदीप पाचंगे यांनी केली.