आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पोलीस उपनिरीक्षकाला लाच घेताना अटक

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • May 2, 2026
Spread the love

पुणे : अदखलपात्र गुन्ह्यात मदत केली तसेच भविष्यात मदत करण्यासाठी स्वतःसाठी आणि वरिष्ठांसाठी ८० हजार रुपयांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

पोलीस उपनिरीक्षक मनोज मधुकर बस्टे (वय ३८, रा. गंगा कळस सोसायटी, कळस, धानोरी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका ३९ वर्षीय नागरिकाने तक्रार दिली आहे. तक्रारदारांचा जमिनीचा व्यवसाय असून लोहगाव पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल झाला होता.

या गुन्ह्यात मदत केल्याबद्दल तसेच भविष्यात मदत करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक बस्टे यांनी तक्रारदारांकडे ७० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्याची तक्रार ३० एप्रिल २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त झाली. या तक्रारीची पडताळणी त्याच दिवशी पंचासमक्ष करण्यात आली.

त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक बस्टे यांनी स्वतःसाठी व वरिष्ठांसाठी ८० हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर १ मे २०२६ रोजी सायंकाळी लोहगाव पोलीस ठाण्यात सापळा रचण्यात आला.

तक्रारदारांकडून ८० हजार रुपये स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षक बस्टे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. यानंतर लोहगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस आयुक्त अजित पाटील आणि अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर व सहकाऱ्यांनी केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक अविनाश घरबुडे करत आहेत.

लोहगाव पोलीस ठाण्यातच सापळा
वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पुण्यात काही महिन्यांपूर्वी ५ नवीन पोलीस ठाणी स्थापन करण्यात आली असून त्यात लोहगाव पोलीस ठाण्याचा समावेश आहे. अदखलपात्र गुन्ह्यात पोलिसांना न्यायालयाच्या आदेशाशिवाय तपास करता येत नाही तसेच वारंटशिवाय आरोपीला अटक करता येत नाही. अशा गुन्ह्यानंतर तक्रारदाराला न्यायालयातून आदेश आणण्यास सांगितले जाते. मात्र, दुसरीकडे आरोपीकडून अशा प्रकारे तब्बल ८० हजार रुपयांची लाच मागण्यात आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.