आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

मजुराच्या डोक्यात दगड घालून खून

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • May 4, 2026
Spread the love

पुणे : दारू पित बसलेल्या व्यक्तीने दारू पिण्यास देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून मजुराच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. कोंढवा पोलिसांनी केटरिंगचे काम करणाऱ्या कामगाराला अटक केली आहे.

मनीषकुमार महादेव पासवान (वय २२, रा. विठ्ठल रुक्मिणी मंदिर, पंचशीलनगर, कोंढवा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. महादेव अर्जुन कांबळे (वय ३५, रा. स्वामी समर्थनगर, कात्रज-कोंढवा रोड) असे आरोपीचे नाव आहे.

याबाबत पोलीस उपनिरीक्षक शिवराज खराडे यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना कोंढव्यातील आर. के. कॉलनी येथील टेकडीच्या कडेला असलेल्या कडुलिंबाच्या झाडाखाली ३० एप्रिल रोजी रात्री ७ ते साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महादेव कांबळे हा केटरिंगचे काम करतो. मनीषकुमार पासवान हा मिळेल तेथे मोलमजुरी करतो.

मनीषकुमार पासवान हा आर. के. कॉलनी येथील टेकडीच्या कडेला कडुलिंबाच्या झाडाखाली एकटा दारू पित बसला होता. त्यावेळी महादेव कांबळे तेथे गेला.

त्याने दारू पिण्यास मागितली. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. तेव्हा कांबळे याने तेथील दगड उचलून पासवान यांच्या डोक्यात घालून त्याचा खून केला. त्यानंतर तो तिथून पळून गेला.

पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहायक पोलीस आयुक्त नम्रता देसाई, पोलीस निरीक्षक दीपक करांडे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.

पोलिसांनी शोध घेऊन महादेव कांबळे याला अटक केली आहे. पोलीस निरीक्षक दीपक करांडे तपास करत आहेत.