दीड कोटींच्या फसवणूक गुन्ह्यातील आरोपीला अटक
सायबर पोलिसांनी साताऱ्यात केली कारवाई : फसवणुकीतील एक लाख घेतले होते बँक खात्यात
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : शेअर मार्केटमधील गुंतवणुकीत चांगल्या मोबदल्याचे आमिष दाखवून १ कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक केलेल्या गुन्ह्यात सायबर पोलिसांनी १ लाख रुपये स्वतःच्या बँक खात्यात घेणाऱ्याला सातारा येथून अटक केली आहे.
सुशांत हणमंत निकम (वय ३८, रा. अपशिंगे, ता. जि. सातारा) असे अटक आरोपीचे नाव आहे. फिर्यादींना टायकुन कॉईन कंपनीमार्फत कंपनीच्या ट्रेडिंग अॅपवर गुंतवणूक केल्यास चांगला मोबदला मिळेल, असे आमिष दाखविण्यात आले.
त्यांना विविध बँक खात्यांमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने रक्कम भरायला लावून कोणताही परतावा न देता १ कोटी ४० लाख १६ हजार ३१५ रुपयांची फसवणूक करण्यात आली.
या गुन्ह्याच्या तपासात फिर्यादींच्या फसवणुकीच्या एकूण रक्कमेपैकी १ लाख रुपये सुशांत निकम यांच्या आयडीबीआय बँकेच्या खात्यावर जमा झाल्याची माहिती मिळाली.
सायबर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सुशील डमरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सातारा येथे जाऊन आरोपीच्या मोबाईल फोनचे तांत्रिक विश्लेषण करून त्याला सातारा येथून ताब्यात घेतले.
त्याच्याकडून एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. मोबाईलमधून प्राप्त माहितीचे तांत्रिक विश्लेषण करून गुन्ह्याचा पुढील तपास करण्यात येत आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक पोलीस आयुक्त शुभदा संख्ये यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, पोलीस निरीक्षक संगिता देवकाते यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक सुशील डमरे, पोलीस अंमलदार संदेश कर्णे, प्रविणसिंग राजपूत, राजूदास चव्हाण, अमर बनसोडे, सतीश मांढरे, शीतल डांगे, अनिकेत भिंगारे व सचिन शिंदे यांनी केली आहे.
अटकेची भीती दाखवून पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडणे, पार्सलमध्ये ड्रग्ज सापडले, इलेक्ट्रिसिटी/गॅस कनेक्शन बंद होईल, ऑनलाइन केवायसी अपडेट अशा प्रलोभने व धमक्यांना घाबरून जाऊ नये.
अशा धमक्या आल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात अथवा सायबर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा. तसेच कंपनीच्या मालकांनी त्यांच्या अकाउंट सेक्शनमध्ये काम करणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांशी सुसंवाद ठेवावा, जेणेकरून अशा गुन्ह्यांतील फसवणूक टाळता येईल, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
ऑनलाइन शेअर गुंतवणुकीबाबत सावधान – शेअर ट्रेडिंगमध्ये जास्त परताव्याचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली जात आहे. ऑनलाइन ट्रेडिंग अॅपवर केवळ आकडे दिसत असतात. प्रत्यक्षात कोणतीही गुंतवणूक न करता फसवणूक केली जाते. त्यामुळे अशा जादा परताव्याच्या आमिषाला बळी पडू नये.
