आंबेगाव पठार येथे युवकाचा निर्घृण खून
एकमेकांकडे बघण्यावरून झाला होता वाद : भारती विद्यापीठ पोलिसांनी चौघा अल्पवयीनांना घेतले ताब्यात
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : एकमेकांकडे रागाने का पाहतो, या कारणावरून झालेल्या वादातून पाच अल्पवयीन मुलांनी एका युवकाच्या डोक्यात कोयत्याने वार करून सिमेंट ब्लॉक घालून निर्घृण खून केला. भारती विद्यापीठ पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
नयन सचिन जाधव (वय १८, रा. आंबेगाव पठार) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. ही घटना आंबेगाव पठार येथील निलगिरी चौक येथे ४ मे रोजी रात्री सव्वानऊ वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नयन जाधव हा बारावीत शिकत होता. आरोपी मुले कोणतेही काम करत नाहीत. दोन दिवसांपूर्वी नयन जाधव व आरोपी यांच्यामध्ये एकमेकांकडे रागाने का पाहतो, यावरून भांडण झाले होते. सोमवारी रात्री सव्वानऊ वाजता आरोपी मुले निलगिरी चौकात वाट पाहत थांबली होती. त्यावेळी नयन जाधव तेथे आला.
या मुलांनी त्याच्या डोक्यावर कोयत्याने वार करून तसेच सिमेंटचा ब्लॉक डोक्यात घातला. त्यात नयन जाधव गंभीर जखमी झाला. त्यानंतर ही मुले पळून गेली. नयन याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
भारती विद्यापीठ पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या एका साथीदाराचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस निरीक्षक कैलास कोडग तपास करत आहेत.
